लपवण्यासारखे काही नसेल तर होऊ द्या ना जेपीसी चौकशी

राफेल प्रकरणात कॉंग्रेसचे मोदींना पुन्हा आव्हान

नवी दिल्ली, दि. 14 – राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला क्‍लीन चीट दिली आहे. याचा अर्थ आता सरकारकडे लपवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. त्यांची या प्रकरणातील बाजू पुर्ण सत्य असेल तर त्यांनी संसदीय चौकशी समितीला सामोरे जाण्यात काय अडचण आहे? असा सवाल करीत या विषयाच्या जेपीसी चौकशीला तयारी दाखवा असे आव्हान कॉंग्रेस पक्षाने दिले आहे.

पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की राफेलच्या विषयाचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होऊ शकत नाही असे आम्ही मागच्याच महिन्यात म्हटले होते. संरक्षण खात्याच्या भ्रष्टाचार विषयाची खरी चौकशी संयुक्त संसदीय समिती नेमूनच होऊ शकते असे आम्ही म्हटले होते आमची हीच भूमिका योग्य असल्याचे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने अधोरेखीत झाले आहे.

संरक्षण खात्याच्या खरेदीचा विषय हा संवेदनशील असतो आणि त्याची चर्चा न्यायालयाच्या व्यासपीठावर होऊ शकत नाही अशीच भूमिका आम्ही सातत्याने मांडली असून त्यामुळेच कॉंग्रेसने या प्रकरणात कोणतीही याचिका न्यायालयात दाखल केलेली नव्हती असे ते म्हणाले. ते म्हणाले की मोदींकडे यात लपवण्यासारखे काही नसेल तर त्यांनी जेपीसी चौकशीला तयार व्हावे असे जाहीर आव्हान मी देतो.

जेपीसी चौकशी झाली तर राफेल मध्ये कोणत्या टप्प्यावर कसा भ्रष्टाचार झाला हे आपोआप समोर येईल. सत्तेच्या सर्वोच्च पातळीवरून हा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोपही त्यांनी केला. सरकारने न्यायालयाला अर्धवट माहिती देऊन दिशाभुल केली असण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तवली. ते म्हणाले की सरकारने न्यायालयात राफेल प्रकरणाची जी माहिती सादर केली आहे त्याची शहानिशा कोणीही केलेली नाही हा महत्वाचा मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)