लज्जापुराण

माणूस निर्माण झाला, पुढारला आणि त्यांच्या शारीरिक जाणिवांपेक्षा मानसिक जाणिवा वाढीस झाल्या, तीव्र झाल्या, तेव्हापासून त्याला “लाज’ वाटू लागली. पूर्ण पोषाख करणे हा शरीरविषयक लाज सुरक्षित ठेवण्याचा भाग झाला. वाणीविलास करताना असभ्य शब्दांचा उच्चार न करण्याचा संकेत लाजेचा भाग झाला. एखादी गोष्ट करावयाची नाही, कारण लाज वाटते. चार लोकात काही करायचे तर लाज वाटते. वेगळे इतरांपेक्षा काहीतरी नवीन असणारे कपडे घालून वावरणे लाजेपोटी शक्‍य होत नाही. लाजेचे अनेक प्रकार आहेत. नववधूचे लाजणे, चेष्टा-मस्करी होताना चेहऱ्यावर येणारी लाललाल लाज, धीट नसणाऱ्या मुलामुलींना काही करताना वाटणारी लाज; नवऱ्याने, बायकोने, मुलामुलीने वा घरातल्या कोणत्याही सदस्याने खाली पाहायला लावणारे कृत्य केल्याने वाटणारी लाज, नातलगांच्या मुलांपेक्षा आपल्या मुलाला कमी गुण पडल्याने निर्माण झालेली लाज, हे सारे प्रकार काहीवेळा आपण अनुभवतो-ऐकतो-वाचतो.
लाज या शब्दाला प्रतिशब्द लज्जा-शरम असाही वापरला जातो. परंतु, त्यातील अर्थाशी तादात्म्य पावणारा एक महत्त्वपूर्ण शब्द म्हणजे “मर्यादा’ हा म्हणता येईल. मर्यादेत राहणे याचा अर्थ लाज बाळगणे होय. मर्यादा ओलांडली की अनर्थ माजलाच म्हणून समजायचा. लाज समाजस्वास्थ्य निर्माण करते. लाज गुणसंवर्धक आहे. लाज असणे उत्तम माणसाचे लक्षण आहे. लाज हा खास करून स्त्रियांचा अलंकार मानला गेला आहे. लाजीरवाणे वाटण्याचा प्रसंग सगळ्यांनाच नकोसा होतो आणि काही वेळा अनेक कोडगी माणसं निर्लज्जपणे वागतात. “निर्लज्जम सदासुखी’ हे एक वचन त्यांच्या कोडगेपणामुळे निर्माण झालेले आहे. ही कोडगी माणसं चार माणसात शिष्टाचार विसरतात. कोणाला काय वाटेल याविषयी यांच्या मनात कोणतीही संवेदनशीलता नसते. आपण करीत असणारे कृत्य वा बोलत असलेले भाष्य याचे होणारे परिणाम त्यांच्या खिसगणतीत नसतात. निर्लज्ज माणसांना समाज टाळत असतो.
आपल्याला लाज वाटण्याचा प्रसंग येऊच नये असे प्रत्येकाला वाटत असले, तरी बहुतांशी प्रत्येकाने लाज वाटल्याचा अनुभव घेतलेला असतो. फजिती नेहमीच लाज वाटायला लावते. शब्दोच्चारात होणारी चूक, रस्त्यावर चालताना अचानक घसरलेला पाय, शर्ट वा पॅंटचे अचानक उसवणे, चारचौघात उडालेला गोंधळ यामुळे होणारी त्रेधातिरपीट लाजायला भाग पाडते.
“जनाची नाही तर मनाची लाज बाळगा’ असे मराठीत एक अत्यंत महत्त्वाचे सुभाषित प्रचलित आहे. माणूस भोवतीच्यांना फसवू शकतो. त्यांच्यासमोर कुठलेही बेताल वर्तन करू शकतो, पण स्वतःच्या मनाला तो फसवू शकत नाही आणि त्या मनासमोर निर्लज्ज होऊन वावरू शकत नाही. तेव्हा जनाची चाड ठेवली नाही, तरी मनाची ठेवावीच लागते. अर्थात हे फक्त निर्लज्ज माणसापुरतंच म्हणणं आहे. लाजेचा आदर करणाऱ्याला लाज बाळगा असं सांगण्याची गरजच पडत नाही. निर्लज्जांना मात्र “लाज’ असते हे समजावून सांगावे लागते.
सार्वजनिक जागेमध्ये होणारे तारुण्यचाळे निर्लज्जपणाचे खुले प्रदर्शन असते. बघणाऱ्याला लाज वाटावी, असा तो प्रकार असतो. बागेत, बसमध्ये, महाविद्यालयीन परिसरात “लाज’ सोडून दिली जाते. नृत्यस्पर्धा, अभिनयस्पर्धांमध्ये अलीकडे कपड्यांची “लाज’ बाळगली जात नाही. बोलण्याची लाज बऱ्याच ठिकाणी हद्दपार झाली आहे. लग्न ठरवताना, ठरल्यावर आणि झाल्यानंतरचे नवे दिवस “लाजून हसण्याचे’ असतात. पण आधुनिक काळाचे वारे लागलेले लग्नाळू लग्नाआधीच चोवीस तासापैकी बारा तास मोबाईलवर एकमेकांशी बोलत असतात, वा बऱ्याचदा भेटतही असतात. त्यामुळे लग्नाला सामोरे जाताना आवश्‍यक असणारा नवथरपणा आणि नव्हाळी संपलेली असते आणि त्यासोबत लाजही.
राजकारणात “लाज’ हा शब्द निषिद्ध आहे. “लाजणारा राजकारणी’ खरं बोलणाऱ्या वकिलाएवढा दुर्मिळ म्हणता येईल. त्यामुळे निलाजरेपणाचा कळस वेळोवेळी होताना दिसतो. अर्थात ते समाजाने गृहितच धरलेले असते. कामचुकार लोकांना निर्लज्ज होऊनच वावरावे लागते. उपटसुंभ-आगंतुक, लावालावी करणारे, निर्बुद्ध, बेदरकार असे सारे लोक लज्जाहीन असतात. स्वतःवर कुठलाही परिणाम होऊ न देण्याचे यांचे वैशिष्ट्य असते. निर्लज्ज लोकांचे “पडला तरी नाक वर’ असे वागणे असते. “सोयरसुतक’ नसणारा निर्लज्ज म्हणूनच ओळखला जातो. निर्लज्जांवर विश्‍वास ठेवणेही बऱ्याचदा धोकादायक ठरते.
लाज चांगले वागण्यास आणि बोलण्यास भाग पाडते. लाज स्वतःवरचा विश्‍वास घट्ट करण्यासाठी मदतगार ठरते. लाजेपोटी का होईना, पण माणसाचा स्वतःवर ताबा राहतो. लाजेला सांभाळण्याची कसरत करताना माणूस जीवन जगण्याची कलाही शिकण्याची मोठी शक्‍यता असते. लाजेसोबत मैत्री नेहमीच व्यक्तिमत्त्वाची उंची वाढविणारी असते. “लाज बाळगा’ हे ऐकण्याची वेळ येण्यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. ती लाजणाऱ्यांवर येत नाही.
एकूणच “लाज’ दिसते, वाटते, जाणवते, कळते आणि तिचे माहात्म्यही नाकारता येत नाही. समाजामध्ये ताठ मानेने वावरण्यासाठी तरी लाज अंगी असावयास हवी. ती नसल्यास समोरच्याच्या नजरेला नजर देणे अशक्‍य होईल. निर्लज्ज माणूस नजर देऊ शकेल, पण त्याची मान कधीच ताठ असणार नाही.
– डॉ. विनोद गोरवाडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)