लग्नाप्रमाणे आता घटस्फोटलाही उरल्या नाहीत देशाच्या सिमेची बंधने

व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दोघापैकी एक अथवा दोघे वेगवेगळ्या देशात असताना होतोय घटस्फोट

विजयकुमार कुलकर्णी

पुणे – प्रगत तंत्रज्ञान, बदलत्या परिस्थितीमुळे संपूर्ण जगच छोटे बनले आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणे हे जनरल बनले आहे. लग्नासाठी जाती-धर्माचा बंधने नवीन पिढीने केव्हाच ओलांडली आहेत. दुसरे राज्य, देश आणि खंडातील व्यक्तीबरोबरच लग्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, दुर्दैवाने लग्नाप्रमाणे घटस्फोटालाही आता देशाच्या सीमेची बंधने उरली नाहीत. एक जोडीदार देशात, दुसरा परदेशात अथवा दोघेही वेगवेगळ्या देशात असताना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घटस्फोट घेणे सहज शक्‍य बनले आहे. त्यामुळे हिंदीतील “चट मंगनी, पट शादी’ ही म्हण सध्याच्या काही जोडप्यांची स्थिती बघता “चट शादी, पट फटस्फोट ‘ अशी बनल्याचे दिसून येत आहे.
फेसबुकच्या माध्यमातून विभिन्न ठिकाणचे तरुण-तरुणी संपर्कात येतात. त्यांच्याच मैत्री होत आणि त्यातून ते लग्न करतात. मात्र, दोन्ही ठिकाणची वेगवेगळी परिस्थती आणि वैचारिक स्वातंत्र्यामुळे काही दिवसांतच त्यांचे खटके उडायला सुरूवात होते. मग ते घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा मार्ग स्विकारतात. स्काईप या तंत्रज्ञानाचा वापर करून घटस्फोट घेतल्याची शिवाजीनगर न्यायालयातही अनेक उदाहरणे आहेत. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी कौटुंबिक न्यायालयासाठी एक व्हिडीओ ऍप विकसित केले आहे. या ऍपवरून देशात अथवा परदेशात कोठेही असलेल्या व्यक्तीशी मोबाईलवरून न्यायाधीशांशी संवाद साधता येणार आहे. विशेष म्हणजे स्काईपद्वारे सुनावणीच्या वेळी परदेशात असलेल्या व्यक्तीला तेथील न्यायालयात जावे लागते. त्यावेळी काही अडचणी येण्याची शक्‍यता असते. मात्र, या ऍपवरून घरात बसून अथवा ती व्यक्ती जिथे असले तेथून कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक, न्यायाधीशांशी संवाद करू शकत आहे. या प्रणालीद्वारे नुकताच पुण्यातील तरूणाने पोलंड येथील पत्नीला या तंत्रज्ञानाद्वारे घटस्फोट दिला. फेसबुकवरून झालेल्या ओळखीनंतर पोलंडमधील तरूणी पुण्यात आली. दोघांनी लग्न केले. मात्र, त्यांचे फार काळ टिकले. त्यातच व्हिसा संपल्याने ती पुन्हा मायदेशी परतली. त्यावेळी तो पुण्यात, ती पोलंडमध्ये असताना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दोघांनी घटस्फोट घेतला. त्यामुळे घटस्फोटसाठी पुर्वीसारखी किचकट प्रक्रिया राहिली नसल्याचे यातून स्पष्ट होते.
घटस्फोट घ्यायचा म्हटले की काही वर्षांपुर्वी अनेक प्रक्रिया पुर्ण कराव्या लागत. त्यात दोघेही तारखांना हजर राहणे गरजेचे असायचे. मात्र, दोघांपैकी एखादा व्यक्ती काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही किंवा तो कामानिमित्त परदेशात असेल तर खटला पुढे ढकलला जात. तसेच पती किंवा पत्नी परदेशातील असेल तर तिला किंवा त्याला दावा दाखल केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहणे आवश्‍यक असायचे. आता मात्र चित्र बदलले आहे. दोन्हीपैकी एक व्यक्ती जर न्यायालयात असेल तर व्हीसीद्वारे संवाद साधून देखील त्यांना घटस्फोट मिळत आहे. यापुढे दोघे वेगवेगळ्या देशात असल्यावरही व्हिसीद्वारे घटस्फोट घेता येत आहे. असाच एक खटला येथील कौटुंबिक न्यायालयात निकाली काढण्यात आला. तो अमेरिकेत होता, तर ती युरोपमध्ये होती. न्यायालयाने दोघांशी व्हिसीद्वारे संवाद साधून घटस्फोट मंजुर केला.

 

प्रगत तंत्रज्ञानामुळे वेळ आणि पैशाची बचत होते. काही वेळेस मानसिक त्रास कमी होण्याची शक्‍यता असते, हे खरे आहे. मात्र, त्याचा अतिरेक वापरण करणे धोकादायक आहे. इगो, गैरसमज अथवा किरकोळ वादावरून काही प्रकरणांमध्ये घटस्पोटासाठी अर्ज केलेले असतात. वकील, समुपदेशक आणि न्यायाधीश या तीन्ही टप्प्यातून समजाविल्यानंतर हे वाद मिटणियाची शक्‍यता असते. तर कित्येक वेळेला कुटुंबातील व्यक्ती यात लक्ष घालून वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, ऑनलाईन समुपदेशन करताना मर्यादा असतात. केवळ दोघांशी संवाद साधून घटस्फोट देणात येतो, हे दुर्दैवी आहे.
ऍड. बिपीन पाटोळे
माजी सदस्य, शिस्तपालन समिती, बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)