लग्नाचे आमिष दाखवून साडेचार लाखाला गंडा

युएसएमधील बड्या कंपनीत सीईओ असल्याचे भासवून केली फसवणूक

  • आरोपीला अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
  • लग्नाची तयारी आणि रिव्हर्स ट्रान्जेक्‍शनसाठी मागितली रक्कम

पुणे – जीवनसाथी डॉट कॉमवर झालेल्या ओळखीतून एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार लाख 28 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबत 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमर अगरवाल उर्फ श्रीकृष्ण अनंत केसकर (वय 27, रा.मु.पो. टिवरापाडी, ता.जि.बीड) याला अटक केली आहे. 6 एप्रिल ते 16 मे 2017 दरम्यान ही घटना घडली.
अटक आरोपी केसकर आणि फिर्यादी यांची जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रोमॉनियल साईटवर ओळख झाली. या ओळखीतून केसकर याने महिलेशी व्हॉट्‌सऍप आणि फोनद्वारे संपर्क साधण्यास सुरवात केली. दरम्यान, फोनवर बोलताना आरोपीने संबंधीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवत स्वत: एसएनएस इन्फोटेक कंपनी कॅलिफोर्निया, युएसए या कंपनीत सीईओ म्हणून काम करत असल्याचे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर लग्नाची तयारी आणि रिव्हर्स ट्रान्जेक्‍शनसाठी फिर्यादी यांना वेळोवेळी स्वत:च्या खात्यात तब्बल चार लाख 28 हजार 946 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर आरोपी पसार झाला असून त्याने आपली फसवणूक केल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन केसकर याला अटक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे हे पुढील प्रकरणाचा तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)