लगेच श्रीगोंद्याला औद्योगिक वसाहत मंजूर करू- खा. सुळे

प्रभात वृत्तसेवा
श्रीगोंदा – राज्यातील आणि देशातील सरकारविषयी जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच चालल्याने जनसामान्यांना जगणे मुश्‍कील बनत चालले आहे. भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करून जनतेची दिशाभूल करीत आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आल्यास पहिल्याच महिन्यात श्रीगोंदयासाठी औद्योगिक वसाहत मंजूर करू, असे आश्‍वासन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
मंगळवारी (दि.2) खा. सुळे श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी महिला व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सुळे म्हणाल्या, भाजप सरकारच्या काळात समाजातील प्रत्येक घटक असमाधानी आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडत चालले आहेत. सिलेंडरचे भाव जवळपास दुप्पट झाले आहेत. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याची फसवी घोषणा ठरली आहे. भाजपचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी बेताल वक्तव्य करीत आहे. मात्र मुख्यमंत्री या बाबींवर शब्दही बोलत नाहीत. या सर्व बाबींमुळे भाजप सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नगर जिल्ह्याने राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. श्रीगोंदा तालुका देखील राष्ट्रवादीच्या बरोबर राहिला आहे. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादीच्या खा. सुळे यांनी काढले.
आमदार राहुल जगताप म्हणाले, माजी मंत्री बबनराव पाचपुते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करतात. गेल्या चार वर्षांत तालुक्‍यासाठी हजारो कोटींचा निधी आणल्याच्या खोट्या भूलथापा मारतात. पाचपुते यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात तालुक्‍यात केलेली विकासकामे आणि मी गेली चार वर्षांत विरोधी पक्षाचा आमदार असताना केलेली विकासकामे याबाबत कधीही खुल्या मंचावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे, असेही आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले. आमदार राहुल जगताप म्हणाले, भाजपचे घोषणाबाज सरकार उलथवून टाकण्यासाठी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोणीही असले तरी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, प्रा. तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के आदी उपस्थित होते.

खा. सुळेंनी साधला विद्यार्थिनीशी संवाद
खा.सुळे यांनी येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी मुक्तपणे ‘युवासंवाद’ साधला. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्‍नांना खा.सुळे सविस्तर उत्तरे दिली. महागाई, शेतकरी आणि त्याच्या समस्या, शिक्षक, फी वाढ, मुलींची सुरक्षितता, राजकारणातील तरुणांचा सहभाग आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी खा.सुळे यांच्याशी तब्बल तासभर चार केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)