लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या नलीचा केला दशक्रिया विधी

अकोले – प्रा डी के वैद्य : महाराजांची प्रवचन सेवा, उपस्थित मान्यवरांची श्रद्धांजलीपर भाषणे, दशक्रिया विधीचे मंत्र पठण, भाऊबंदांचे मुंडण, दशक्रिया विधीनंतर मिष्ठान्न भोजन, त्यासाठी मोठा मंडप, जमलेले भाऊबंद, नातेवाईक, समाज बांधव, मित्रमंडळी, ग्रामस्थ, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती. हे कोणत्या राजकीय नेत्याच्या किंवा बड्या असामीच्या दशक्रिया विधीचे नाही, तर ‘नली’ नावाच्या शेळीच्या दशक्रिया विधीचे वर्णन.
नाचणठाव (ता.अकोले) गावचे सरपंच नामदेव भिवा मधे यांच्या परिवारात 22 वर्षांपूर्वी ‘नली’ नावाच्या शेळीचे आगमन झाले. त्यानंतर घरात सुबत्ता आली. मुला, नातवंडांबरोबर नली मोठी होत गेली. या कालावधीत तिने 35 करडांना जन्म दिला. नलीची ही 35 अपत्येही मधे कुटुंबानी पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळली. त्यांना विकले अथवा कसायाच्या हवाली केले नाही.
मात्र लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या नलीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. संपूर्ण मधे कुटुंब शोकसागरात बुडाली. मात्र माणसाप्रमाणे प्रथम दिवसाचे विधी मधे कुटुंबाने केले. माजी सरपंच नामदेव भिवा मधे यांनी नलीचा दशक्रिया विधी यथासांग घालून तिच्या ऋणातून उतराई होण्याचा मनोदय व्यक्त केला व आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचा निश्‍चय सरपंच मच्छिंद्र नामदेव मधे यांनी केला.
सोयरे-धायरे, नातेवाईक, मित्रमंडळी, राजकीय पदाधिकाऱ्यांना दशक्रिया विधीचे रीतसर निमंत्रण दिले. परिसरात दशक्रिया विधीचे फ्लेक्‍स बोर्ड लावले. जेवणासाठी मालची, घुगरी, भाताचा मेन्यू ठरवला. मोठा मंडप टाकला. यावेळी अकोले तालुका वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष विश्वनाथ महाराज शेटे यांचे प्रवचन झाले. रामनाथ महाराज जाधव, डॉ. राजेंद्र उघडे, भाऊसाहेब देशमुख, अगस्ती हायस्कूलचे प्राचार्य भाऊसाहेब जाधव, शिंदे यांनी नलीला श्रद्धांजली वाहिली. यावेळी मोठ्याप्रमाणावर ठाकर व अन्य समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाची परिसरात जोरदार चर्चा सुरू होती. कार्यक्रमासाठी बाळासाहेब किसन मधे, रंगनाथ विठ्ठल मधे व सर्व ठाकर समाज बांधव व नाचणठाव ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)