#लक्षवेधी: सार्वजनिक उत्सवातील झुंडशाही, दुर्घटना क्‍लेशदायीच! 

जयेश राणे 
सण-उत्सव साजरे करणे या धार्मिक बाबी आहेत. धर्मशास्त्र सांगते त्याप्रमाणेच कृती करणे योग्य असते. तसे न करता अन्य जे केले जाते त्यास निव्वळ मनोरंजनच म्हणता येईल. धर्मशास्त्राचे पालन करणे सण-उत्सवांचा आत्माच असतो. तोच जर त्यात नसेल, तर वरकरणी त्या गोष्टी साजऱ्या करून काय उपयोग ? त्यास उत्सव कसे म्हणावे? 
सार्वजनिक उत्सव म्हटले की लगेच आठवण होते ती दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या उत्सवांची. हे तिन्ही उत्सव महाराष्ट्रात उत्साहात साजरे होतात. उत्सव म्हणजे आनंद आणि समाधान! उत्सवातून याच गोष्टी मिळाव्यात, अशी भाविकांची अपेक्षा असते. मात्र ती 100% पूर्ण होत नाही. उत्सव शास्त्रानुसार साजरे होऊ लागले तर, त्यांतील आनंदावर विरजण पडण्याचा प्रश्‍नच नाही. सार्वजनिक उत्सवांना हिंसक कृत्यांमुळे गालबोट लागते, तेव्हा उत्सवात हा काय गोंधळ चालू आहे, असा प्रश्‍न भाविकांना पडतो. पण सर्वचजण तो व्यक्‍त करून दाखवत नाही.
उत्सवात वाद निर्माण करून काय मिळते? वादच करायचे होते, सार्वजनिक उत्सव साजरा करताना रागावर संयम नसेल, सर्वांना सामावून घेण्याची व्यापक विचारधारा नसणाऱ्यांनी सार्वजनिक उत्सवात का उतरावे, असेही प्रश्‍न निर्माण होतात. सार्वजनिक उत्सव त्या उत्सवांच्या पूर्व तयारीपासून ते उत्सव संपेपर्यंत शांततेत कसे पार पडतील याकडे कटाक्षाने लक्ष असले पाहिजे. कित्येक सार्वजनिक उत्सव मंडळे याकडे बारीक लक्ष ठेवून असतात. मात्र ज्यांचे या सूत्राकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांनी याविषयी अवलोकन केले पाहिजे. 
पुण्यामध्ये दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करत एका 24 वर्षीय दुकानदाराची हत्या केली. हे प्रकरण ताजे असतानाच येथील आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाने दहीहंडीची वर्गणी दिली नाही या कारणास्तव त्याची दुचाकी जाळली गेली. रानावनात अनेक दिवसांपासून उपाशी असलेली हिंस्र जनावरे शिकारीवर तुटून पडत त्याचे जसे लचके तोडतात, त्या पठडीतील हे प्रकार आहेत. असे हिंसक प्रकार करून उत्सव साजरा करण्यास काहीच अर्थ राहात नाही. या गुंडप्रवृत्तीच्या लोकांमुळे सण-उत्सवास गालबोट लागते.
अन्य मंडळांसह चढाओढ करण्यासाठी पैशांची उधळपट्टी करणे, जमा झालेल्या पैशांवर उत्सवात मौज करणे आदी कारणांसाठी अशी मंडळी वर्गणीचा उपयोग करत असतील, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय? उत्सवासाठी वर्गणी गोळा करताना हिंसक होण्याला, खंडणी, हप्ता गोळा करणे, असे का म्हणू नये? या लोकांत देवाविषयी श्रद्धा, भाव, भक्ती असणे कसे शक्‍य असेल ? ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव’, हे कसे शक्‍य आहे ? देवाच्या नावे उत्सवात झुंडशाही करणाऱ्यांवर कधीतरी देवाची कृपा होईल का ? सार्वजानिक उत्सव साजरे करणाऱ्या विभागातील मंडळाशी वाद नको म्हणून नागरिक मंडळे सांगतील त्याप्रमाणे वर्गणी देऊन विकतचा वाद ओढवून घेणे टाळतात. उत्सवांच्या कालावधीसाठी विशेष ऍप तयार करून त्याद्वारे तक्रार करण्याची सुविधा असावी. त्यामुळे या कालावधीत असे कितीप्रकार राज्यात घडतात, हे समजेल आणि त्या अनुषंगाने या अपप्रकारास अटकाव घालण्यासाठी काय करता येईल, यावर मंथन करून उपाययोजना शोधता येईल. 
धर्मशास्त्रास बाजूला रेटून बहुतांश उत्सव साजरे केले जात आहेत. धर्म आहे तिथे आनंद आहेच आणि जिथे धर्म नाही तिथे अंध:कार आहे, हे कटू सत्य आहे. समाजाकडून घेण्यात येणाऱ्या वर्गणीवरच सार्वजनिक उत्सवांची मदार असते. याचा जेवढा विचार होतो, तेवढा विचार उत्सव “धार्मिकरित्या’ पार पाडण्यासाठी काय करता येईल, याचा होईल का? त्याविषयी कृतीशील विचार झाला, तरच उत्सवाचा उद्देश सफल होईल. 
दहीहंडी फोडताना गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू होणे, दुखापतीमुळे अस्थिभंग होणे, कायमचे अपंगत्व येणे असे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी आयोजकांनी आवश्‍यक काळजी घेतली पाहिजे, दहीहंडी पथकांनीही दक्ष असले पाहिजे, आदी सूत्रे अशा दुर्घटनांनंतर काही दिवस चर्चेत राहतात आणि पुढील वर्षीचा गोपाळकाला येईपर्यंत त्यावर पुन्हा पडदा टाकला जातो. सण-उत्सव साजरे करताना आणि झाल्यावर वातावरण उत्साही असायला पाहिजे; मात्र दहीहंडी त्यास अपवाद ठरते.
कारण दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात एका बाजूला उंच थर लावणाऱ्या पथकाचे छायाचित्र असते, तर दुसऱ्या बाजूला या वेळी झालेल्या दुर्घटनेची माहिती असते. धार्मिक कार्यक्रमावेळी दुर्घटना घडण्यास आपणच कुठेतरी कारणीभूत आहोत, याचा विचार होत नाही. या कार्यक्रमांना कुठलेही गालबोट लागणार नाही, याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे दायित्व आहे. त्यासाठी धार्मिक कार्यक्रम हे शास्त्राच्या चौकटीत राहूनच केले पाहिजे. याचा पूर्णपणे विसर पडल्याचे अनुभवण्यास मिळते. आधुनिकतेच्या नावाखाली धर्मालाही आधुनिकतेकडे खेचण्याचा हा प्रकार धार्मिकदृष्ट्या अक्षम्य अपराध आहे. 
मुंबई, ठाणे येथील उंच थरांच्या आणि लाखो रुपयांची उधळण करणाऱ्या दहीहंड्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतात. या गोष्टी पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने जमाव उपस्थित असतो. एवढ्या जमावाला थांबवून ठेवायचे म्हणजे त्यांच्या मनोरंजनासाठी व्यासपीठावर नाच-गाणी यांचे आयोजन असतेच. हे सर्व चालू असतांना शिट्ट्या, अश्‍लील शेरेबाजी, विचित्र आवाजात किंचाळ्या मारणे आदी विकृत गोष्टींना उधाण येते. धार्मिक कार्यक्रम साजरा करण्याची ही अत्यंत चुकीची प्रथा राज्यात रुजली आहे. या प्रकारे दहीहंडीचा उत्सव साजरा केला पाहिजे, हे कुठल्या शास्त्रात सांगितले आहे ? पुण्यातील बुधवार पेठमध्ये दहीहंडीच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू असतानाच स्टेज कोसळल्याची घटना घडली.
यात जवळपास 15 जण जखमी झाले आहेत. स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने स्टेज कोसळल्याचं सांगितले जात आहे. उत्सवात अशा दुर्घटना होणे नक्कीच चिंताजनक आणि चिंतन करण्याजोगे आहे. अशा ठिकाणी बचावकार्य राबवताना पोलीस यंत्रणेवर किती ताण येत असेल याचा विचार होईल का ? 
धार्मिक गोष्टींसाठी सवड नाही, त्यांची आवडही नाही, असे अभिमानाने सांगणारी मंडळी आहेत. मात्र, त्यांच्याकडे उत्सवांतील मनोरंजनासाठी वेळच वेळ असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दहीहंडी उत्सव! येथे दहीहंडी उत्सवाकडे बोट दाखवत नसून त्यातील चुकीच्या गोष्टींकडे लक्षवेध करत आहे. चुकीला चूकच म्हटले पाहिजे. जे कौतुकास्पद आहे त्याचे कौतुकही झाले पाहिजे आणि अनुकरणही झाले पाहिजे. पुणे येथील विविध स्वयंसेवी संस्थांनी रुग्णांना सुगंधी दुधाचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य अशा उपक्रमांच्या माध्यमातून गोपाळकाल्याच्या या धार्मिक उत्सवाला विधायक स्वरूप प्राप्त करून देत सामाजिक कर्तव्य पार पाडले. 
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । 
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ।। 
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । 
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।। 
या दोन श्‍लोकांचा अर्थ पुष्कळ अर्थपूर्ण माहिती सांगतो. हे लक्षात घेता सण-उत्सव यांत धार्मिकता कुठे आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. धार्मिक गोष्टींचे बाजारीकरण निश्‍चितच खटकणारे आहे. भगवंताला अपेक्षित असा धार्मिक कार्यक्रम आपण करत आहोत का? 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)