लक्षवेधी: विक्रमी (कॉंग्रेसेतर) मुख्यमंत्री फडणवीस…

शेखर कानेटकर

महाराष्ट्र राज्याच्या आजवरच्या इतिहासात वसंतराव नाईक यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहणारे दुसरे मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नोंद होणार हे आता पक्‍के झाले आहे. या भाग्याबद्दल फडणवीस यांचे अभिनंदन करावयास हवे. यापुढील वर्षभरात कोणतीही अद्‌भुत घटना, उलथापालथ झाली नाही तर पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणूनही फडणवीस यांची नोंद होऊ शकेल.

राज्याच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेले फडणवीस हे सतरावे नेते आहेत. पण गेल्या 58 वर्षांत वसंतराव नाईक यांचा अपवाद वगळला तर अन्य कोणीही एवढा त्या पदावर टिकू शकला नव्हता. पण फडणवीस यांनी ते साध्य केले आहे. तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक तब्बल 11 वर्षे 2 महिने 15 दिवस मुख्यमंत्रिपदावर राहिले. (5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975) त्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान आजपर्यंत विलासराव देशमुख यांच्याकडे होता. दुसऱ्यांदा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे हे पद 4 वर्षे 1 महिना 3 दिवस (1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008) होते. पण फडणवीस यांनी आता त्यांना मागे टाकले आहे. दिनांक 31 ऑक्‍टोबर 2014 रोजी फडणवीस यांनी राज्याचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्याला 31 ऑक्‍टोबरला 4 वर्षे पूर्ण झाली. येत्या 4 डिसेंबर रोजी ते विलासरावांना मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर जातील.

शरद पवार तीनदा, शंकरराव चव्हाण- वसंतदादा पाटील-विलासराव देशमुख दोनदा मुख्यमंत्री झाले; पण त्यांना सलग पाच वर्षे काम करण्याचे भाग्य लाभले नाही. पण ते फडणवीस यांना लाभणार असे दिसते. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले पहिले दोन मुख्यमंत्री विदर्भाचेच राहिले हे विशेष. फडणवीस यांचे सध्याचे राजकीय वजन पाहता ते महाराष्ट्र विधानसभेच्या पुढील निवडणुकीपर्यंत कायम राहणार, हे पण जवळपास निश्‍चित आहे.

स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून असलेला लौकिक फडणवीस यांनी आजपर्यंत कायम ठेवला आहे. त्यांच्यावर आजवर एकही गंभीर स्वरूपाचा आरोप झालेला नाही. गेल्या चार वर्षात फडणवीस यांनी भाजपला राज्यातील सर्व निवडणुकीत (ग्रामीण भागासह) भरघोस यश मिळवून देण्याची कामगिरी बजावली आहे. विरोधक व पक्षांतर्गत विरधक या दोघांनाही त्यांनी राजकीय कौशल्य वापरून डोईजड होऊ दिलेले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असले तरी महाराष्ट्रात भाजपचा चेहरा व सारी भिस्त फडणवीस हेच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला सध्या तरी फडणवीस यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी स्थिती आहे.

या सर्व गोष्टींमुळे फडणवीस यांनी पक्षाचे विद्यमान सर्वेसर्वा नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा पूर्ण विश्‍वास कमावला असल्याने त्यांची ती बाजूही चांगलीच भक्कम आहे. त्यामुळे उरलेला सुमारे वर्षभराचा कालावधी ते पूर्ण करतील, याबद्दल शंका घेण्यास फार वाव नाही. खुद्द फडणवीस यांनी आताचा वर्षाचा कालावधीच काय, पण पुढील निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरून त्यांचा आत्मविश्‍वासही दिसून येतो. अर्थात राजकारणात फार पुढचे सांगता येत नाही, हेही तितकेच खरे. मधल्या काळात मराठा आरक्षण आंदोलन फार भडकले तेव्हा फडणवीस यांना बदलणार, त्यांना केंद्रात नेणार अशा वावड्या उठल्या होत्या किंवा उठविल्या गेल्या होत्या. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.

भाजप-शिवसेना युतीचे महाराष्ट्रातील हे दुसरे सरकार आहे. वर्ष 1995-1999 या काळातील पहिल्या सरकारमध्ये शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने सेनेचे मनोहर जोशी प्रथम मुख्यमंत्री होते. त्यांनी हे पद तीन वर्षे 10 महिने सांभाळले. पण मध्येच मुख्यमंत्री बदलण्याची कॉंग्रेसची परंपरा शिवसेना नेतृत्वानेही पाळली आणि थोड्या काळासाठी नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपदावर बसविले. पण ते जेमतेम आठ महिनेच मुख्यमंत्री राहिले. वर्ष 1999 मध्ये युतीची सत्ता गेली. तर 15 वर्षांनी युतीला पुन्हा सत्ता मिळाली तेव्हा भाजपकडे मुख्यमंत्रिपद आले. त्यांनी मात्र फडणवीस यांच्याकडे एकहाती मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली आहे.

फडणवीस यांच्या आधी महाराष्ट्रात तब्बल 16 मुख्यमंत्री झाले. त्यातील 14 मुख्यमंत्री तर एकट्या कॉंग्रेसचे होते. राज्यात यापूर्वी बरेचदा पत्ते पिसल्याप्रमाणे, निव्वळ राजकीय सोईसाठी मुख्यमंत्री बदलले गेले आहेत. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून मध्येच केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले गेले. तर केंद्रात मंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठविले गेले होते. नंतर गरज पडली म्हणून शरद पवार, शंकरराव चव्हाण यांना महाराष्ट्रात परत पाठविले गेल्याची उदाहरणे आहेत.

स्वच्छ प्रतिमा, राज्यात सर्व पातळ्यांवर पक्षाला मिळवून दिलेले यश, यामुळे गेल्या चार वर्षांत फडणवीसांवर अस्थिरतेची टांगती तलवार राहिलेली नाही, हे विशेष. जोडीला मोदी-शहा यांचा भक्कम पाठिंबा राहिल्याने फडणवीस यांनी आपले स्थान मजबूत केले आहे. तेच पक्षाचा राज्यातील एकमेव चेहरा बनले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)