लक्षवेधी: केरळचा महापूर ही राष्ट्रीय आपत्तीच 

अशोक सुतार 
सध्याच्या कालावधीत केरळ आणि संपूर्ण मल्याळी समाजात ओणम’ या सणाचा उत्साह दरवर्षी पाहायला मिळतो. पण, सद्यस्थिती पाहता “ओणम’ सण साजरा न करण्याचा निर्णय मल्याळी समाज संघटनांनी घेतला आहे. काही मल्याळी संघटनांनी ओणम’ सणासाठी समाजाकडून पूरग्रस्तांसाठी निधी गोळा केला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस, पुराचा प्रलय यामुळे जवळजवळ अर्धे केरळ पाण्याखाली गेले आहे. 
केरळातील महापुराचे नैसर्गिक संकट आता ओसरत असले तरी या संकटाने मनुष्यप्राण्यासह सजीवसृष्टीचे, स्थावर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. येत्या पाच वर्षांत तरी हे नुकसान भरून निघेल, असे वाटत नाही. गेले 15 दिवस हे छोटेसे राज्य प्रलयंकारी पुराला तोंड देत आहे. केरळात गेल्या 100 वर्षांतील सर्वाधिक पाऊस कोसळला. गावेच्या गावे वाहून गेली, लाखोंहून अधिक बेघर झाले आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. केरळमधील पुराच्या बातम्यांना आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी सुरुवातीला म्हणावे एवढे महत्त्व दिले नाही. हे असंवेदनशील असल्याचे लक्षण म्हणायचे की देशातील दक्षिण भारताबद्दल आकस म्हणायचा, हे समजत नाही.
विविध समाजमाध्यमांत या महापुराची चर्चा झाली, त्यानंतर सूत्रे हलू लागली. स्वातंत्र्यदिनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरस्थितीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर परिस्थिती बदलली. नंतर हवाई दल, लष्कर आणि अन्य अनेक सेवाभावी संस्थांनी मदतीचा ओघ सुरू केला. दिल्लीतील सत्ताधीशांनी केरळकडे हवे तितके लक्ष दिले नाही, अशी भावना मल्याळी मनांत रूजू लागली आहे. त्यात केंद्र सरकारने सुरुवातीला केरळसाठी केवळ 100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती, ती अगदीच हास्यास्पद होती. कारण पहिल्या फेरीतच पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा 8,500 कोटी रुपये इतका होता. त्यानंतर या मदतीची रक्कम केंद्र सरकारने 500 कोटी रुपये केली आहे.
विशेष म्हणजे, केरळला संयुक्‍त अरब अमिरातीने (यूएई) 700 कोटी रुपयांची मदत करण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली. मात्र, केंद्राने ही मदत नाकारली, ते योग्यच झाले. केरळमध्ये ख्रिश्‍चन आणि मुसलमान या दोन्ही धर्मीयांची संख्या लक्षणीय आहे. उत्तरेतील काही हिंदू धर्मप्रेमींनी केरळच्या या प्रतिमेविषयी अत्यंत अनावश्‍यक असे भाष्य केले, ते खचितच योग्य नाही. “गोमांस खाणाऱ्यांचे प्रमाण केरळात अधिक असल्याने हा निसर्गाचा प्रकोप झाला,’ असेही अकलेचे तारे त्यातील काहींनी तोडले. काही जणांनी तर “शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश दिल्याने हे संकट कोसळले,’ असेही म्हटले आहे. नैसर्गिक संकटांमध्ये धर्म, जात पाहणारी ही माणसेच आहेत का, असा प्रश्‍न त्यामुळे उद्‌भवत आहे.
केरळमध्ये मुसळधार पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सरकारने “रेड अलर्ट’ची सूचना नुकतीच मागे घेतली आहे. त्यामुळे मदत आणि बचावकार्याला वेग आला आहे. मात्र केरळमधील या महाप्रलयामध्ये जवळपास 357 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 20 हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ऑगस्ट 1931 मध्ये म्हणजे 87 वर्षांपूर्वी असाच मुसळधार पाऊस कोसळला होता.
आताच्या महाप्रलयामध्ये 357 जणांचा बळी गेला. दहा लाख 78 हजार नागरिक बेघर झाले. राज्यातील 40 हजार हेक्‍टर पिकांची नासधूस झाली तर 26 हजार घरे जमीनदोस्त झाली आहेत. एक लाख किलोमीटर रस्ते खराब झाले आहेत. तर 134 पूल खराब झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
केरळमध्ये पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे 600 कोटींचे नुकसान झाले. रस्ते खराब झाल्यामुळे 13,000 कोटींचे तर पूल तुटल्यामुळे 800 कोटींचे नुकसान झाले आहे. आठ ऑगस्टपासून सुरू झालेल्या पावसामुळे सुमारे 10 लाख लोकांना सुरक्षितस्थळी न्यावे लागले. नैसर्गिक संकट ओढावलेल्या केरळला आता जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यूएईतील भारतीय वंशांच्या उद्योगपतींनीही 12.5 कोटी रुपये मदतीचे आश्‍वासन दिले आहे. महाराष्ट्र सरकारनेही केरळला तातडीची 20 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पुण्यातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी ट्रेनने पाठवले आहे. दुसरीकडे केरळ सरकारने 30 ऑगस्ट रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याची तयारी सुरू केली आहे. अधिवेशनात मदतकार्य, पुनर्वसन आणि पुनर्निर्माण यावर चर्चा केली जाणार असून, यासंदर्भातील शिफारस राज्यपालांना लवकरच केली जाईल, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी नुकतीच दिली.
जगभरातून मदतीचे हात केरळकडे येत आहेत. केरळमधली पूरस्थिती हे “तीव्र नैसर्गिक संकट’ असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले असले तरी त्यापूर्वीच राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. केंद्र सरकारने या “नैसर्गिक संकटा’कडे सहानुभूतीने पाहात ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे घोषित करणे गरजेचे आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
1 :heart:
4 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
58 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)