लक्षणीय: उसातल्या बिबट्याने बदलविली डार्विनची तत्त्वे 

डॉ. अजय देशमुख 

एरव्ही जंगलात आपल्याच रुबाबात आणि ऐटीत राहणाऱ्या बिबट्याच्या जंगली जीवनात आताशा स्थित्यंतर आले आहे. जुन्नर तालुक्‍याच्या माणिकडोह परिसरात उसाच्या शेतात राहणारा बिबट्या जंगली संस्कृतीतून बाहेर पडत, शेतीमधल्या जीवनाला सरावल्याचे चित्र दिसून येत आहे. आक्रमक आणि डरकाळ्या फोडून आपली दहशत पसरवणारा, हा अन्न साखळीतल्या परमोच्च स्थानी विराजमान असलेला बिबट्या आपल्या सवयी बदलताना दिसतो आहेच, शिवाय तो स्वभावाने हळूहळू भित्राही बनत चालला आहे, असे म्हणायला वाव आहे. चार्ल्स डार्विनने मांडलेल्या सजीवांच्या उत्क्रांतीविषयक अनेक तत्त्वांना उसात लपणाऱ्या बिबट्याने आव्हान दिल्यासारखे चित्र निर्माण झाले असून जीवशास्त्राच्या संशोधकांनी यावर आता सखोल आणि मूलगामी असा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे सुचवावेसे वाटते. 

जुन्नर तालुका हा कृषीप्रधान तालुका, एकाच तालुक्‍यात पाच धरण त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाली, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. उसाच्या शेतीचा पर्याय निवडलेला शेतकरी या भागात चांगलाच सुखी संपन्न झाला. परंतु दुसऱ्या बाजूला बिबट्याचं आधिवास नष्ट होऊन आपण प्रगत झालो हे कळालेच नाही. बिबट्यासुद्धा कुठे मागे राहिला त्यानेसुद्धा स्वभावानुसार स्वतःला या उसाच्या शेतात ऍडजस्ट केले. हेच तर सांगायचंय तुम्हाला मागील 20 वर्षांपासून हा बिबट्या आपल्या सोबत उसात राहायला लागला, या बिबट्याची तिसरी पिढी सुरू असेल ऊसातील वास्तव करण्याची. बिबट्या मादी इथेच प्रजनन करू लागली व पिलं देऊ लागली, ही बिबट पिलं आपल्याला पाहत मोठी होऊ लागली. त्यांना जंगल माहीत नाही. पिल्लांना त्यांची आई दोन वर्षे पर्यंत शिकविते कुठ जायचे, कुठे पाणी प्यायाचे, कोणापासून लपून राहायचे, कुठे खाद्य मिळणार हे सगळे प्रशिक्षण आई देते. ही पिलं उसातच वाढत आहेत व हे त्यांचंच घर आहे म्हणून राहात आहेत. त्यांना जंगल माहीतच नाही. उसातील बिबट्याने
स्वतःमध्ये पूर्ण बदल घडवून आणला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिले जंगलात हरीण, ससा खाणारा बिबट्या आता कुत्रा, मांजर, शेळी, मेंढी, डुकर आणि अगदी काहीच मिळाले नाहीतर उंदीर, घुस खायला लागला व त्याचे ते प्रमुख अन्न झाले. बिबट्याचे पिल्लं स्वभावत: ऊस आपले घर मानू लागले व खेळताना उसाच्या बाहेर येऊन मस्ती करतांना आपल्या शेतकरी बांधवाना दिसू लागले. जंगलात खूप श्रम करणारा हा बिबट्या, उसामध्ये येऊन आळशी झाला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. बिबट्याने आहाराबरोबर स्वतःमध्येसुद्धा बदल केले. एरव्ही बिनधास्त जंगलात वावरणारा हा प्राणी उसामध्ये मात्र भिऊन राहायला लागला. शेतकरी कधी शेतात येतो, कधी जातो, काय करतो, हे सगळं अभ्यासून तो बाहेर पडू लागला व शिकार करून परत उसामध्ये बसू लागला; लपू लागला.

उसातील घाबरट बिबट्या आता मानवाच्या जीवनमानानुसार वागतोय. तो घाबरट झाला नसता तर जुन्नर तालुक्‍यात रोज एका माणसावर हिंस्त्र बिबट्याचा हल्ला झाला असता. मादी बिबट्यासमोर तर खूपच मोठे आव्हान उभे राहिले. प्रजनन केलेल्या स्वतःच्या पिलांना संभाळणे, त्यांना ऊस तोडला जात असताना हलविणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या खाद्याची काळजी घेणे, अशा सर्व आव्हानाला सामोरे जात, ती मादी बिबट्या आज उसाच्या फडात आपली पिलं मोठी करते आहे.

बिबट्याला मानवासोबत उसाच्या अवतीभोवती राहताना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडणे, पिंजऱ्यात अडकणे, अनेकदा अंदाजच न आल्याने चुकून एखाद्या घरात शिरणे अशा समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. या सगळ्या आव्हानांना पेलत त्या बिबट्याला, त्याच्या कुटुंबाला आपल्यासमवेत जगायचं आहे.

बदललेल्या राहणीमानानुसार बिबट्या आता मानवासमोर येऊन शिकार करण्याससुद्धा डगमगत नाही. ऊस तोडणी सुरू झाली की आपले घर बदलायचे असते; नव्हे बदलावेच लागते, हेसुद्धा त्यांना आताशा माहीत झाले आहे. मग ते दुसरीकडे, म्हणजेच दुसऱ्या उभ्या असलेल्या उसात आसरा घेऊ लागले. ऊस तुटला म्हणजे तात्पुरते स्थलांतर करायचे, हे त्यांनाही अंगवळणी पडलं आहे.

पुस्तकी ज्ञान असणारे बरेच बिबट अभ्यासकांना डार्विनच्या सर्व थेअरी या उसातील बिबट्याने गुंडाळून ठेवण्यास भाग पाडले व नवीन अभ्यास करावा, असे सुचविले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बिबट्या हा स्वतःचा प्रदेश तयार करतो व त्याचा हा प्रदेश पाच चौरस किमीचे क्षेत्र असतो, हे पूर्णपणे चुकीचे ठरविले ते येथील उसातील बिबट्याने. आपण मोठमोठे वाडे सोडून आता जशे फ्लॅटमध्ये आलो तसेच या बिबट्यानेसुद्धा घर छोटे केले. आणि ते दुसरे तिसरे नसून उसामध्ये लपलेले घर!

उसातील मिळालेला छान, सुरक्षित आसरा, योग्य पोषक हवामान व खाण्यासाठी सहज मिळालेले भक्ष्य यामुळे त्याच्या शरीरयष्टी व जीवनशास्त्र यामध्ये बदल निश्‍चित झाले आहेत, असे जाणवते. यावर निश्‍चित नव्याने अभ्यास व्हावा. हा बदललेला बिबट्या सुचवितो की काय असे वाटते व ते खरे आहे.

कालानुरूप बिबट्याने केलेले स्वतःमध्ये बदल खरच महत्त्वाचे आहे. बिबट्याच्या जगण्याच्या लढाईमध्ये त्याने स्वतःमध्ये हे बद्दल घडवून आणले. जगण्याच्या संघर्षाने त्या प्राण्याला कुठे आणून ठेवले हे त्यालासुद्धा कळाले नसेल. आज तो मानवाला विचारतोय “तुमच्यासाठी मी इतका बदललोय तुम्ही माझ्यासाठी बदलणार का?’
आता ही वेळ आहे मानवाला कटु सत्य स्वीकारण्याची आपण ज्याचे क्षेत्र हिरावून घेतले व प्रगती केली त्या प्राण्याला आपल्या सोबत जगू द्यायचे की नाही? हा प्रश्‍न घेऊन हा उसातील बदललेला बिबट्या तुमच्या समोर उभा आहे. सहजीवन मागतोय बदललेला बिबट्या !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)