लकवा झालेल्या “हाता’ला बळ मिळणार का?

विखे-थोरातांना करावी लागणार शून्यापासून सुरुवात

नगर – नगर शहरात कॉंग्रेसचे अस्तित्व केवळ नावालाच उरले आहे. मतदार आहेत; पण कार्यकर्तेच नाही, अशी स्थिती झालेल्या कॉंग्रेसला गटबाजीने पुरते पोखरले आहे. अशा परिस्थितीमध्ये कॉंग्रेस महापालिका निवडणुकीला सामोरी जात आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाला 11 जागा मिळाल्या होत्या; परंतु सध्याची स्थिती पाहता कॉंग्रेसला तेवढ्या जागा तरी पुन्हा मिळणार का, याबाबत साशंकता आहे. लकवा झालेल्या “हाता’ला बळ कसे मिळणार, हा खरा प्रश्‍न आहे. पक्षाला पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर आली आहे; परंतु त्यांनाही शहरात पक्ष बांधणीची सुरुवात शून्यापासून करावी लागणार आहे.
कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेले नगर शहर कधी भगवे झाले, हे कॉंग्रेसला कळले नाही. कॉंग्रेसचे माजी शहरजिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याच्या कार्यकाळापर्यंत शहरात कॉंग्रेसचे अस्तित्व दिसत होते; पण त्याला खून प्रकरणात अटक होवून आता जन्मठेप झाल्यानंतर कॉंग्रेसला उतरती कळा लागली. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला 11 जागा मिळाल्या होत्या. केडगावमधून कोतकर गटाने सहा जागा मिळवल्या होत्या. शहरातून दोन कोतकर समर्थक निवडून आले होते. उर्वरित तीन जागांवर निवडून आलेले उमेदवार त्यांच्या व्यक्तिगत करिश्‍म्यावर निवडून आले होते. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. 11 नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक अपात्र ठरले. एकाने पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला आहे. काही शिवसेनेबरोबर राहून कॉंग्रेसची टिमकी वाजवित आहेत. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ नगरसेवक किती असा प्रश्‍न पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
गेल्या निवडणुकीपासून शहरात थोरात यांच्या गटाचे अस्तित्व राहिले नाही. कोतकर गटाने विरोधी पक्षनेता विखे गटात जाणे पसंत केले आहे. त्यामुळे शहरात सध्या तरी विखे गटाचा बोलबाला आहे. असे असले तरी विखेंच्या माध्यमातून शहरात पक्ष वाढीसाठी काही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे आज पक्षाची ही अवस्था झाली आहे. जिल्ह्यात विखे व थोरात यांच्यातील संषर्घ सर्वश्रुत आहे. शहरातदेखील वाद होता; मात्र आता आ. थोरात गटाचे बोटावर मोजता येतील एवढेच कार्यकर्ते राहिले आहेत. अर्थात विखे गटाची काही वेगळी स्थिती नाही; पण विखे गटातील कोतकर गट काही प्रमाणात प्रभावी आहे. गटबाजी व जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे आज शहरात कॉंग्रेसला घरघर लागली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा पराभव झाला असला, तरी कॉंग्रेस म्हणून त्यांना 28 हजार मते मिळाली; मात्र या निवडणुकीतील पराभवानंतर तांबे शहरात रमले नाहीत. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणुकीत मदत केली, ते वाऱ्यावर पडले. तांबे यांनी शहरात संघटना बांधणीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी गटबाजीला पाठबळ दिले. त्यामुळे आ. थोरात यांना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी अन्य पक्षात जाणे पसंत केले, तर काहींनी विखे गटाची कास धरली. पक्षाची पूर्ण वाताहत झाली आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस पुढील तीन महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीला सामोरी जात आहे.
या निवडणुकीची जबाबदारी विखे व थोरात यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांना नगर शहरातील कॉंग्रेसची वस्तुस्थिती माहिती आहे. इतक्‍या प्रतिकूल परिस्थितीत पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आव्हान या दोन्ही नेत्यांवर आहे. त्यासाठी त्यांना शून्यापासून शहरात काम सुरू करावे लागणार आहे. आज अन्य पक्षांकडून मातब्बर उमेदवार आयात करण्याची रणनीती आखली जात आहे. फोडाफोडीचे सत्र सुरू झाले आहे. त्यात कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवकदेखील अन्य पक्षांनी गळाला लावले आहेत. त्यामुळे उरली सुरली कॉंग्रेसदेखील संपविण्याचा प्रयत्न मित्रपक्षांसह विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या दृष्टीने ही निवडणूक सर्वबाजूंनी आव्हानात्मक ठरणार आहे.

महिलाध्यक्षविनाच निवडणूक
कॉंग्रेसला सध्या शहर महिला अध्यक्षच नाही. यापूर्वीच्या अध्यक्षांना पदावरून दूर केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महिलाध्यक्षविनाच निवडणुकीला पक्ष सामोरा जात आहे. 68 जागांपैकी 34 जागा महिलांसाठी राखीव आहेत. महिला अध्यक्ष नसलेला पक्ष एवढ्या संख्येने महिला उमेदवार कसा देणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)