रोहित राऊत आणि हरगुन कौर यांनी गायले ‘तू अशी जवळी राहा’चे शीर्षक गीत

झी युवाने अवघ्या २ वर्षांच्या कालावधीतच वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या कथा आणि त्यांच्या सादरीकरणातील नावीन्य यामुळे झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. झी युवा वाहिनीच्या प्रेक्षकांची ऑक्टोबर महिन्याची सुरुवात देखील तितक्याच धमाकेदारपणे झाली आहे कारण नुकतंच झी युवाने आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी ‘तू अशी जवळी राहा’ ही नवी मालिका सादर केली आहे. या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिका साकारत आहेत. नावाप्रमाणे ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची.

मालिकेत सिद्धार्थ बोडके राजवीरची भूमिका निभावत आहे. जो एक अत्यंत चाणाक्ष मुलगा आहे ज्याला पराभव मान्य नाहीये आणि दुसरीकडे तितिक्षा तावडे ही मनवाची व्यक्तिरेखा साकारत आहे, जी एक स्वतंत्र आणि स्वावलंबी मुलगी आहे. ही बाकीच्या प्रेमकथांपेक्षा थोडी वेगळी कहाणी आहे. दोघांच्या वेगळ्या स्वभावामुळे त्यांच्यासमोरील आव्हानांभोवती मालिकेचे कथानक फिरणार आहे.

-Ads-

या मालिकेचं शीर्षक गीत देखील तितकच श्रवणीय आहे. त्याची एक झलक झी युवाच्या सोशल मीडियावर टिझर रूपात पोस्ट केली असून हे गाणं प्रेक्षकांच्या भलतच पसंतीस पडलं आहे. हे गाणं संगीत सम्राट पर्व १ चा निवेदक आणि सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि संगीत सम्राट पर्व २ ची स्पर्धक हरगुन कौर यांनी गायलं आहे. मराठी सिनेसृष्टीला अनेक हिट गाणी देऊ केलेल्या संगीतकार अविनाश विश्वजित या जोडीने या शीर्षक गीताला चालबद्ध केले आहे. गाण्याला त्याच्या शब्दांमुळे अर्थ येतो आणि या गाण्याचे बोल तितकेच सुंदर आहेत जे वैभव जोशी यांनी लिहिलेत.

या शीर्षक गीताबद्दल बोलताना रोहित राऊत म्हणाला, “तू अशी जवळी राहा मालिकेचं शीर्षक गीत हे मालिकेला अगदी साजेसं आहे आणि ते प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल. संगीत सम्राट पर्व २ची स्पर्धक हरगुनसोबत मी पहिल्यांदा गाणं गायलं आहे आणि हरगुनने तिला मिळालेल्या या संधीचं सोनं केलंय. आम्ही दोघे देखीलप्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत.”

संगीत सम्राट पर्व २ ची स्पर्धक हरगुन म्हणाली, “संगीत सम्राट पर्व २ मुळे मला ही सुवर्णसंधी मिळाली. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश विश्वजित आणि लोकप्रिय गायक रोहित राऊत या महारथींसोबत गायचा माझा पहिला अनुभव होता आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी झी युवाची आभारी आहे.”

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)