रोहन, आदर्शची अंतिम फेरीत धडक

 

पुणे – रायझिंग स्टार्स क्‍लब आयोजित चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 21 वर्षांखालील गटात अग्रमानांकित रोहन खिवंसरा आणि तृतीय मानांकित आदर्श गोपाळ यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

नखाते क्रीडासंकुल, रहाटणी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत अग्रमानांकित रोहन खिवंसरा याने चौथ्या मानांकित मिहिर ठोंबरे याचा 13-11, 11-9, 15-13, 11-9 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित आदर्श गोपाळने द्वितीय मानांकित रजत कदमला पराभूत करत स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली. आदर्शने रजतचे आव्हान 11-8, 11-5, 11-9, 12-10 असे सहज परतावून लावले.

रोहनने त्याआधी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बिगर मानांकित विराज नखातेचा कडवा प्रतिकार 11-8, 12-10, 11-7, 11-5 असा मोडून काढताना उपांत्य फेरीत गाठली होती. तर आदर्शने मिथिलेश पंडितवर 8-11, 11-7, 11-8, 11-2, 11-7 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला होता.

महिला एकेरीत सलोनी शहा, उज्वला गायकवाड, अंकिता शिंदे आणि सई बकरे यांनी अनुक्रमे सुप्रिया गडकरी, रसिका लोधी, वैष्णवी पवार आणि नेहा पुरी यांच्यावर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. स्पर्धेतील पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटात मृणमयी रायखेळकर आणि अनीहा डिसोझा, तर अठरा वर्षांखालील मुलांच्या गटात रजत कदम आणि रोहन खिवंसरा यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)