रोमणवाडी-सासवड गाडीसाठी आंदोलनाचा इशारा

जेजुरी-जेजुरी शहराच्या पूर्व-उत्तर दिशेला असलेल्या आणि रोमणवाडी -पांडेश्वर, नाझरे या गावांना तालुक्‍याच्या गावांशी जोडणारी रोमणवाडी – सासवड ही एसटी बस वेळेवर सोडण्यात यावी अन्यथा जेजुरी येथील आंबेडकर चौकामध्ये रास्ता रोको करण्यात येणार असून त्याला सर्वस्वी एसटी महामंडळाचे अधिकारी जबाबदार असतील असा इशारा माजी उपसभापती माणिकराव झेंडे पाटील, पांडेश्वर गावाच्या सरपंच वैजयंता शिंदे, माजी सरपंच प्रताप रासकर, संजय जगताप आदींसह सुमारे 53 विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती सासवड आगारप्रमुख, महामंडळाचे विभागीय नियंत्रक, तहसीलदार पुरंदर, जेजुरी पोलीस ठाण्याला देण्यात आल्या आहेत. रोमणवाडी -सासवड ही एसटी सकाळी पावणेसातच्या सुमारास पांडेश्वर येथे येते. यावेळी जेजुरी व सासवड येथे महाविद्यालयात जाण्यासाठी 40 ते 50 विद्यार्थी असतात. मात्र बहुतांश वेळा ही बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते. मग महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खासगी वाहनांची सोय पाहावी लागते. तसेच दुपारी 1 वाजता सासवड येथून सोडण्यात येणारी रोमणवाडी गाडी वेळेवर सोडली जात नाही त्यामुळे अनेकांना ताटकळत बसावे लागते. यापूर्वी रोमणवाडी -पांडेश्वर -नाझरे गावाच्या लोकप्रतिनिधी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी अनेकवेळा निवेदने -अर्ज केलेले असूनही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. गुरुवारी (दि.10)तीनही गावातील संतप्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येत निवेदन तयार केले असून, पुढील काळात आगारप्रमुखांनी दखल घेतली नाही तर जेजुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)