रोधलेल्या वाटा…

– डॉ. दिलीप गरूड

आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजात अनेक संस्था किंवा संघटना आहेत. या संस्था किंवा संघटना विशिष्ट हेतूने प्रेरित झालेल्या असतात. काही संघटना राजकीय किंवा सामाजिक काम करतात; तर काही संघटना शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा वाङ्‌मयीन कार्य करतात. प्रत्येक संस्थेची काही घटना असते, त्याची नियमावली असते. या नियमावलीनुसार पदाधिकारी काम करतात. प्रत्येक पदाधिकाऱ्याची काही कर्तव्ये असतात, तर घटनेनुसार त्यांना काही अधिकार बहाल केलेले असतात. संस्थेची उच्च विचारधारेवर आधारित उद्दिष्टे असतात. त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संस्था काम करते.

सुरुवातीला संस्थेचे काम चांगले चालते. त्या कामाला समाजमान्यता मिळते. सर्वत्र संस्थेच्या कार्याचा बोलबाला होतो. दरवर्षी संस्थेचे वार्षिक अहवाल प्रसिद्ध होतात. त्यात संस्थेच्या वाटचालीबरोबरच आर्थिक ताळेबंदही मांडला जातो. संस्थेची उत्तरोत्तर भरभराट होत असते. मात्र, ही भरभराट काही धूर्त माणसांना पाहावत नाही. ते संस्थेच्या कार्यात “विशेष’ लक्ष घालतात. सुरुवातीला ते साधे सदस्य होतात. नंतर कार्यकारिणीवर निवडून येतात. तेथे कार्यकारिणीत गटबाजी करतात. त्यातून दोन गट निर्माण होतात. हे दोन गट एकमेकांचे हाडवैरी असल्यासारखे वागतात. निवडणुकीत हे दोन गट उरतात. अहमहमिकेने निवडणूक लढवतात. निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांनी धूर्तपणे आपल्याला मानणाऱ्यांना सभासद करून घेतलेले असते. त्यामुळे आपल्या गटाची सदस्य संख्या वाढलेली असते. त्यामुळे निवडणूक जिंकणे त्यांना सहज सोपे जाते आणि ज्यांनी संस्था स्थापन केली ते अल्पमतात जातात. निवडणुकीत हरतात. पुढे पुढे तर त्यांना एकटे पाडून संस्था सोडावयास भाग पाडतात.

असे प्रकार अनेक संस्थांत घडतात. त्यासाठी अनेक वर्षे योजनापूर्वक व्यूहरचना केली जाते. घरच्या मालकालाच चोर ठरवले जाते. मग अशी ध्येयवादी माणसे एकाकी पडतात. त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेतल्या जातात. त्यानंतर त्यांच्या पुढे दोन पर्यात शिल्लक राहतात. कायदेशीर मार्गाने लढा देणे. आपली सत्याची बाजू सभासदांना, समाजाला पटवणे, त्यातून संघटन वाढवणे आणि संस्थेवर ताबा मिळवणे किंवा या घाणेरड्या चिखलफेकीतून बाहेर पडून आपल्या मार्गाने चालत राहणे. काही ध्येयनिष्ठ माणसे अनेक वर्षे कायदेशीर लढा देऊन यशस्वी होतात. तर काही माणसे या भ्रष्ट राजकारणापुढे टिकाव धरू शकत नाहीत. ती एकाकी पडतात आणि पराभूत होतात. मी तर अशी काही उदाहरणे पाहिली आहेत की ध्येयनिष्ठ संस्थापकांनाच बाहेरची वाट दाखविल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला. ते संदर्भहीन बोलू लागले. एकटेच स्वतःशी वेड्यासारखे बडबडू लागले. म्हणून शहाण्यांनी वेड्याच्या गर्दीत कधी जाऊ नये असे म्हणतात. कारण ती गर्दी अखेर शहाण्या माणसालाच बाहेर काढत असते. म्हणून अशा शहाण्या माणसांनी सरळ संस्थेतून बाहेर पडावे. त्यात कमीपणा मानून घेऊ नये. कारण कमीपणा घेण्यासाठीही मोठे मन असावे लागते.
आपण स्थापन केलेल्या संस्थेतून अपमानित होऊन बाहेर पडावं लागणं यासारखं दुःख नाही. म्हणजे आपण लावलेल्या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या आपल्यादेखत चोरांनी चोरून नेण्यासारखाच हा प्रकार आहे. परंतु, लोकशाहीच्या नावाखाली मूळ संस्थापकाचीच बहुमताच्या जोरावर गच्छंती केली जाते. मात्र, आपण हार न मानता स्वाभिमानाने सरळ बाहेर पडावे. नवीन मार्ग शोधून नवीन वाटचाल सुरू करावी. एक दार बंद झाले तर तुमच्यासाठी नवीन दार खुले झालेले असते. पण होते काय की, पहिले दार बंद झाल्यामुळे आपण खिन्नपणे त्या बंद दाराकडेच बघत राहतो. त्या बंद दाराचाच अहोरात्र विचार करतो. मनुष्यस्वभावाला ते धरूनच आहे. तरीही त्याकडे पाठ फिरवून आपल्यासाठी उघडलेल्या नवीन दाराकडे जाणीवपूर्वक पाहावे.

जे निर्धाराने बंद झालेल्या दाराकडे पाठ फिरवून, उघडलेल्या दारातून हसतमुखाने प्रवेश करतात तेच नवीन वाट निर्माण करतात आणि जीवनात यशस्वी होतात. म्हणून ज्यांचे कटकारस्थान करून, एकाकी पाडून दार बंद केले जाते. त्यांनी न डगमगता नव्या संधीचा शोध घेतला तर पुन्हा तेही कर्तृत्वाचा डोंगर उभा करू शकतात.
ही झाली अलीकडच्या काळातील संस्थांची स्थिती आणि त्यांची कार्यपद्धती. पूर्वीही धर्मसंस्था, वर्णसंस्था आणि जातसंस्था या पुरातन संस्था होत्या आणि अजूनही आहेत. या संस्थांची चौकट अतिशय मजबूत आणि भक्कम होती. ती चौकट मोडणे महाकठीण! याच जात नावाच्या कडवट संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खालच्या जातीचा, मागास, अस्पृश्‍य म्हणून हिणवले. हिंदू धर्मसंस्थेने आणि जातसंस्थेने त्यांचे विकासाचे मार्ग रोखले. तो मार्ग बंद झाला म्हणून मग आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. स्वतःची नवीन वाट शोधली. पहिले दार बंद झाल्यावर मग त्यांनी त्या दाराकडे ढुंकूनही पाहिले नाही. स्वतःचा नवीन राजरस्ता शोधला. मात्र, त्यासाठी अंगी असावा लागतो आत्मविश्‍वास, निर्धार, जिद्द आणि जिगर! आंबेडकर हताश आणि निराश न होता बेडरपणे व्यवस्थेला प्रश्‍न विचारत राहिले. म्हणून एक दरवाजा बंद झाला तरी ज्ञानशक्तीच्या जोरावर नवीन दरवाजा उघडता येतो हे आंबेडकरांनी दाखवून दिले. तशी संधी दृश्‍य-अदृश्‍य स्वरुपात आपल्याभोवती वावरत असते. पण एखाद्याच आंबेडकरांना ती संधी शोधता येते. बाकीचे फक्त चाचपडत राहतात. म्हणून डोळसपणे संधीचा शोध घेऊन संधीचे सोने करणे यातच जीवनाची इतिकर्तव्यता असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)