रोगप्रतिकारक शक्तीचे मूळ : स्तनपान

आईचं दूध बाळासाठी अमृतच असतं. बाळाच्या वाढीत त्याला मोलाचं महत्त्व आहे. बाळ जन्मल्यापासून ते सहा महिन्यांचं होईपर्यंत आईच्या स्तनपानावर वाढलं पाहिजे. त्यानंतर पुढील दोन वर्ष तरी आईच्या दुधासोबत पूरक व पोषक अन्न त्याला मिळायला हवं, तरच त्याची वाढ योग्यरीत्या होऊ शकते. ऑगस्टचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह असतो. यानिमित्ताने स्तनपानाविषयी जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे…

जन्मणाऱ्या बाळाच्या वाढीसाठी मातेचं दूध अत्यंत गरजेचं असतं. दुधात तान्हुल्या बाळाच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्यं समाविष्ट असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बाळ जन्मल्यापासून ते सहा महिन्यांचं होईपर्यंत आईच्या स्तनपानावर वाढलं पाहिजे. त्यानंतर पुढील निदान दोन वर्ष आईच्या दुधासोबत पूरक असं बाह्यअन्न त्याला मिळायला हवं. तरच, त्याची सुदृढ वाढ होऊ शकते. मात्र, स्तनपानाविषयी समाजातील चुकीच्या रुढी-परंपरा, गैरसमजुतींमुळे बालकांना योग्य आहार मिळत नाही. या सर्व समजुती दूर केल्यास बालकांच्या आरोग्यात मोठा बदल घडून येऊ शकतो.

आईचं दूध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असलं तरी काही मातांना विविध कारणांमुळे बाळांना स्तनपान देणं शक्‍य होत नाही. परदेशातील फिगर कॉन्शिअस महिला स्तनपान देणं टाळतात. भारतातील बहुसंख्य महिलांची तशी विचारसरणी नसली तरी सिझेरियन झालेल्या अनेक मातांमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांत दूध येत नाही. काही माता या कुपोषित असतात तर काहींना अन्य कारणास्तव स्तनपान देणं शक्‍य होत नाही. त्यामुळे अर्भकांचं कुपोषण होतं आणि जगभरातील एक तृतीयांश मुलं कुपोषणाने मृत्युमुखी पडतात. त्यातली दोन तृतीयांश जन्मल्यानंतर एका वर्षाच्या आत दगावतात.

स्तनपान व आरोग्याची काळजी या दोन बाबी बाळासाठी पहिल्या वर्षी अत्यंत निकडीच्या असतात. स्तनपान तर छकुल्यासाठी एक प्रकारचं वरदानच असतं. स्तनपानामुळे बाळाला अनेक फायदे होतात. आईचे दूध हे नैसर्गिक असल्याने बाळाच्या वाढीला आवश्‍यक असणारी सर्व पोषकतत्त्वं मिळतात. त्याचबरोबर स्तनपानामुळे मुलांची बौद्धिक व मानसिक क्षमता वाढण्यास मदत मिळते. आईचं दूध निर्जंतुक असतं. त्यामुळेच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्याचा लाभ मुलांना भावी आयुष्यात होतो. रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, दमा यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळतं.

ज्याप्रमाणे स्तनपानाचे बाळाला फायदे होतात, त्याप्रमाणेच आईलाही यातून फायदा होतो.
गरोदरपणात वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते. प्रसूतीनंतर होणारा अतिरिक्त रक्तस्राव कमी होतो. गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास मदत होते. उतारवयातील हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण मिळतं. स्तन, अंडाशय व गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

आईने प्रसूतीनंतर स्तनपानाला लवकरात लवकर सुरुवात केल्यास स्तनपान जास्त काळ सुरू राहण्याची शक्‍यता वाढते. पहिल्या दोन-तीन दिवसांत येणारं चीक दूध बाळासाठी पौष्टिक असते. त्यातून बाळाची भूक व तहान भागवण्यास मदत मिळते. तसेच या दुधात अ व क ही जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं लक्षात आलं आहे की, चीक दुधात स्टेमसेल्सचं प्रमाण जास्त असल्याने बाळाला नसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती मिळते.

स्तनपान ही आई आणि जन्मलेल्या बाळातील दुवा साधणारी एक प्रक्रिया आहे. आईच्या स्तनांमध्ये अमुक इतकं दूध तयार होतं असं काही मोजमाप नाही. मुलाला जितकं जास्त अंगावर पाजाल तितकी जास्त दूधनिर्मिती होण्याची प्रेरणा मिळेल. बाळाला अंगावर पाजणाऱ्या आईमध्ये ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या होत असते. तुम्हाला मिळालेली ही देणगी आहे, असा आत्मविश्‍वास असायला हवा. तसंच बाळाला स्तनपान देताना तुमचं मन प्रसन्न असलं पाहिजे, कारण स्तनपान आणि मेंदूचा जवळचा संबंध आहे.

तुम्ही काळजी किंवा चिंता करत असाल अथवा मानसिक ताणतणावाखाली असाल तर बाळाला दूध येण्यासाठी अडथला निर्माण होऊ शकतो. ऑक्‍सिटॉसिन रक्तप्रवाहात मिसळण्याची क्रिया होत नाही. त्यामुळे दूध बाहेर येणं कमी होतं. बाळ स्तनाग्र चोखू लागल्यावर त्यावेळी मेंदूमध्ये प्रोलॅक्‍टिन तयार होऊन रक्तप्रवाहात सोडलं जातं. प्रोलॅक्‍टिन स्तनापर्यंत पोहोचतं तेव्हा तिथल्या दुग्धनिर्मिती करणाऱ्या ग्रंथींना चालना देतं. तेव्हाच दूधनिर्मिती होते.

बाळाचा वाढतो बुध्यांक
आपलं बाळ अधिक सुदृढ आणि आनंदी होण्यासाठी, आयुष्यभराचं नातं जोपासण्यासाठी स्तनपान आवश्‍यक आहे. कारण मातेच्या दुधातूनच बाळाला आहार आणि प्रेम दोन्हीही मिळत असतं. मातेचं दूध हेच बाळासाठी योग्य पोषण आहे.

लहान मुले ही आई-वडिलांचे जीव की प्राण असतात. आपली मुले सुदृढ व गुटगुटीत असावीत. त्यांची बुद्धिमत्ता चांगली असावी. त्यांनी सगळ्या गोष्टी झटपट शिकाव्यात, अशी पालकांची इच्छा असते. त्यासाठी ते लहान मुलांना चांगलं चागलं खाऊ घालतात. त्यांना विविध गोष्टी शिकवतात. मात्र, सर्वच मुलांना ते शिकणे जमत नाही. नियमित आईचे दूध पिणाऱ्या मुलांचा बुध्यांक अधिक असतो. ही मुले शाळेत अधिक चांगल्या रीतीने चमकतात, असे नवीन संशोधनात आढळले आहे.

आईचे दूध पिणाऱ्या मुलांचा भावनांक अधिक असतो. तसेच ही मुले वयाच्या 9व्या महिन्यांपासून वाचायला शिकतात. नियमित स्तनपान करणाऱ्या मुलांचा आत्मविश्‍वास अधिक असतो, तसेच ही मुले शाळेय जीवनात चांगल्या प्रकारे चमकतात. ही मुले भावनिकदृष्टया अधिक सुरक्षित असतात. वयाच्या चौथ्या वर्षी ही मुले गणित व वाचायला शिकतात.
या संशोधनासाठी संशोधकांनी 7500 माता व त्यांच्या मुलांचा अभ्यास केला. ही मुले जन्मल्यापासून पाच वर्षापर्यंत त्यांच्या प्रत्येक बाबींचा अभ्यास केला. या संशोधनात त्या मुलाच्या घरचे वातावरण, आई-वडिलांचे संस्कार आदींवर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले. तसेच आई व मुलांच्या हालचालींच्या व्हिडीओ चित्रफिती तयार करण्यात आल्या. ही मुले त्यांना दिलेले आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होती. त्याला त्यांची आई मदतीचा हात देताना दिसत होती. सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ स्तनपान करणारी मुले वाचनात अधिक चांगली असल्याचेही आढळून आले होते.

एचआयव्हीपासूनही संरक्षण
एचआयव्हीसारख्या महाभयंकर रोगाला प्रतिबंध करणारे औषध शोधण्यासाठी शास्त्रज्ञांन अद्याप यश आलेले नाही, पण मातेच्या दुधामधील एका प्रथिनामध्ये एचआयव्हीला निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचे समोर आले आहे. एचआयव्ही ग्रस्त मातेकडून बाळामध्ये संक्रमण होणाऱ्या एचआयव्हीच्या विषाणूंना आईच्या दुधामुळे अटकाव होतो. हे प्रथिन टेनासिन-सी किंवा टीएनसी या नावाने ओळखले जाते. एखादी जखम झाल्यास ती लवकर बरी होण्यामध्ये ही प्रथिने महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. पण नवीन संशोधनामुळे या प्रथिनांमध्ये एचआयव्हीला रोखण्याचीही क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे.

आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ नये यासाठी आजपर्यंत आपण अँटीरिट्रोवायरल ड्रग्जचा वापर करत होता, पण जगामध्ये प्रत्येक गर्भवती महिलेची एचआयव्ही चाचणी करण्यात येत नाही. तसेच 60 टक्‍क्‍यांपेक्षा कमी महिलाच अँटीरिट्रोवायरल ड्रग्ज घेतात. विशेषत: ज्या देशांमध्ये आरोग्य साधनांची कमतरता असते त्या देशांमध्ये गर्भवती महिलांची एचआयव्ही चाचणी करण्यात येत नाही. यामुळेच आईकडून बाळाला या रोगाची लागण होऊ नये यासाठी अन्य एका उपचार पद्धतीची आवश्‍यकता आहे.

आईच्या दुधावर संशोधन केले असता या दुधामध्ये एचआयव्हीच्या विषाणूची तीव्रता कमी करण्याची क्षमता असल्याचे दिसून आले. त्यामुळे आईच्या दुधातील विविध घटकांचा सविस्तरपणे अभ्यास केल्यानंतर आईच्या दुधामध्ये असलेले टीएनसी ही प्रथिने एचआयव्हीची तीव्रता कमी करत असल्याचे स्पष्ट झाले.

जेव्हा एखादे बाळ स्तनपान करते त्यावेळी बाळाला आईकडून थेट मिळणाऱ्या या दुधामधील टीएनसीमुळे बाळामध्ये एचआयव्हीला रोखण्याची क्षमता निर्माण होते, असे परमार यांनी सांगितले. त्यामुळे जगातील सर्वच मातांनी आपल्या बाळांना रोज अंगावरच दूध पाजावे.

डॉ. मेधा क्षीरसागर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)