नवी दिल्ली – बॅंकिंग आणि एटीएम व्यवस्थेत रोकड पुरवड्यात सुधारणा झाली असली तरी रोकडटंचाई अजून कायम आहे. अर्थात, ही स्थिती लवकरच सुरळीत होईल, असा विश्वास बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
देशाच्या विविध भागांत मागील काही दिवसांपासून रोकडटंचाईची समस्या उद्भवली. त्यानंतर केंद्र सरकारने केलेल्या वेगवान हालचालींमुळे या समस्येची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी झाली. मात्र, अजूनही टंचाईची स्थिती कायम असल्याची माहिती विविध बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात बोलताना भारतीय स्टेट बॅंकेचा (एसबीआय) एक अधिकारी म्हणाला, देशभरातील आमच्या पीओएस टर्मिनल्समधून विनाशुल्क रोकड काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पैसे काढण्याचा अतिरिक्त पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला आहे. एटीएममधील अपुऱ्या रोकड पुरवठ्याची स्थितीही लवकरच सुरळीत होईल, अशी आशाही संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या कर्नाटक राज्याची जनताही रोकडटंचाईमुळे त्रस्त होती. मात्र, तेथील स्थितीत मागील दोन ते तीन दिवसांपासून सुधारणा झाल्याचे कॅनरा बॅंकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ठेवींच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात 2 हजार रूपयांच्या नोटा बॅंकिंग व्यवस्थेत परत येत नसल्याचे काही दिवसांपासूनचे चित्र आहे. मात्र, आता त्या नोटांचाही पुरवठा होत असल्याकडे कॅनरा बॅंकेच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या एटीएममधील रोकड पुरवठा सुरळीत झाल्याचे म्हटले आहे. तर एका बड्या खासगी बॅंकेच्या अधिकाऱ्याने रोकडटंचाई कायम असल्याचे म्हटले. संबंधित बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेला अधिक पुरवठ्याची विनंती केल्याचे समजते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा