रॉबर्ट वढेरा सीबीआयच्या रडारवर

जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू

नवी दिल्ली -राजस्थानमधील भाजप सरकारच्या शिफारसीवरून सीबीआयने आज बिकानेरमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित 18 प्रकरणांचा तपास सुरू केला. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांची कंपनीही घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप आहे. त्यामुळे वढेरा सीबीआयच्या रडारवर आल्याचे मानले जात आहे.

बिकानेरमधील काही जमीन व्यवहारांत अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्यावरून राजस्थान पोलिसांनी 2014 मध्ये 18 गुन्हे दाखल केले. त्यातील 4 गुन्हे वढेरा यांच्या कंपनीविरोधात दाखल करण्यात आले. राजस्थान सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर सीबीआयने 18 गुन्ह्यांची फेरनोंद केली आहे.

आता सीबीआयने चौकशी सुरू केल्याने वढेरा यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. कुठल्याही जमीन घोटाळ्यात सामील नसल्याची भूमिका वढेरा यांनी आधीपासूनच घेतली आहे. तर राजकीय लाभासाठी भाजपकडून सीबीआय, ईडी आणि इतर यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याच्या आरोपाचा कॉंग्रेसकडून पुनरूच्चार करण्यात आला आहे. बिकानेरमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित घडामोडीवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)