रॉबर्ट वढेरांनाही हवाय खट्टर यांचा राजीनामा

नवी दिल्ली – हरियाणात बाबा राम रहिम यांच्या अनुयायांनी जो भीषण धुडगुस घातला त्यात 36 लोकांचे प्राण गेले, 250 जण जखमी झाले आणि कोट्यवधी रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी केली आहे.

हरियाणातील स्थिती खट्टर यांनीच बिघडू दिली आहे असा स्पष्ट शेरा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मारला आहे त्याअनुषंगानेही वढेरा यांनी त्यांच्यावर निशाणा साधताना ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून त्वरीत पदावरून दूर झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी म्हटले आहे की हरियाणातील घटनेमुळे सारा देश हादरला आहे. जगाच्या नजरेतून भारताची प्रतिमा डागाळली गेली आहे.

केंद्र सरकारने या देशात सुरक्षित राहण्याचा नागरीकांचा अधिकार अबाधित ठेवला पाहिजे आणि असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची खात्री दिली पाहिजे अशी अपेक्षाही वढेरा यांनी व्यक्त केली आहे. वढेरांच्या जमीन व्यवहारावरून त्यांचा हरियाणा सरकारशी वाद आहे. आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवून नाहक त्रास दिला जात असल्याची तक्रार वढेरा यांनी या आधीच केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी खट्टर सरकारवर साधलेल्या या निशाण्याला महत्व दिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)