रेल्वे स्टेशनवर तिकीटबारीवर प्रवाशांची तारांबळ

संग्रहित छायाचित्र

डेक्‍कन, खडकी, चिंचवडमधील बायोमेट्रिक मशिन धूळखात


मशिनमध्ये महाघोटाळा झाल्याचा अॅड. आशुतोष रानडे यांचा आरोप

पुणे- रेल्वे स्टेशनवर नागरिकांना आरक्षण प्रवास तिकीट काढण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तासन्‌तास रांगेत थांबूनही तिकीट उपलब्ध होत नसल्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. 2016 पासून पुणे डिव्हिजनमध्ये वेगवेगळे बदल केल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुणे विभागाने दोन वर्षांपूर्वी सुमारे तीस लाख रुपयांची बायोमेट्रिक मशिन विकत घेतली आहे. प्रत्येक मशिनची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे.

सद्यस्थितीत ही मशिन डेक्‍कन, खडकी, चिंचवड आरक्षण केंद्रात बसविण्यात आली असून बसविल्यापासूनच ती बंद अवस्थेत आहेत. देखभाल दुरुस्तीचा प्रति मशिन वार्षिक खर्च सुमारे 19 हजार रुपये असून बायोमेट्रिक मशिनमध्ये महाघोटाळा झाला आहे, असा आरोप अॅड. आशुतोष रानडे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा उपस्थित होत्या.

रानडे म्हणाले, अस्तित्वात नसलेल्या मशिनचा देखभाल-दुरुस्ती खर्च रेल्वेतील काही अधिकारी दाखवत आहेत. नागरिकांच्या खिशातून ही रक्‍कम जात आहे. माहितीचा अधिकार कायदा वापरून मी महाघोटाळ्याची माहिती उपलब्ध केली आहे. मी दि. 27 नोव्हेंबर 2017 रोजी डेक्‍कन येथील आरक्षण केंद्रात गेलो असता मी आरक्षण केले. त्यानंतर दुसऱ्या तिकिटाकरिता पुन्हा रांगेत उभे राहिलो असता किमान दोन तासांनी दुसरे आरक्षण तिकीट मिळेल, असे सांगण्यात आले. याबाबत विचारले असता एकाच व्यक्‍तीने तिकीट आरक्षित केले तर कमीतकमी दोन तासांनी दुसरे तिकीट मिळते, असे अजब उत्तर मिळाले. रेल्वेचा महसूल बुडवणारे काही अधिकारी असून असा नियमच अस्तित्त्वात नाही, असा दावा रानडे यांनी केला आहे.

तिकीट नाकारल्याबाबत राष्ट्रपती, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना लेखी स्वरूपात पत्र पाठविण्यात आले आहे, असेही रानडे यांनी सांगितले. हर्षा शहा म्हणाल्या, पुणे विभागात दररोज तीस इन्स्पेक्‍शन होतात. डेक्‍कन येथील आरक्षण केंद्रातील बायोमेट्रिक मशिन वापराविना बंद असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या कसे काय लक्षात आले नाही? शो पिस म्हणून ही मशिन ठेवण्यात आली आहेत का? या प्रकाराची चौकशी झालीच पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)