रेल्वे पोलिसांनी पळून आलेली मुले केली पालकांच्या स्वाधीन

504 जणांचे आयुष्य पुन्हा प्रकाशमान

– गणेश राख

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – पालकांशी वादविवादातून घेतलेला निर्णय, शहराचे आकर्षण, कामासाठी तसेच मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगूण अल्पवयातच घर सोडून येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. पळून आल्यानंतर रेल्वे स्थानकालाच आपले घर मानणारे असे एकूण 606 विद्यार्थी वर्षभरात रेल्वे पोलिसांना आढळून आले. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे समुपदेशन करून यातील तब्बल 504 विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन, तर 102 जणांना स्वयंसेवी संस्थांकडे सोपविण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांच्या या कामामुळे 504 विद्यार्थ्यांचे आयुष्य पुन्हा प्रकाशमान झाले.

विविध कारणांमुळे घर सोडून शहराच्या ठिकाणी पळून येणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. शहराचे आकर्षण, घरातील भांडणे तसेच मनमोकळे फिरण्याच्या भावनेतून अनेकजण घर सोडून येत आहेत. पळून आल्यानंतर रेल्वे स्थानकांवर मिळेल ते खाऊन दिवस काढण्याचा मार्ग निवडला जातो. रेल्वे पोलीस, स्वयंसेवी संस्था यांना असे विद्यार्थी दिसून येतात. त्यांना आधार देत त्यांचे समुपदेशन करण्याचे काम केले जाते. समुपदेशनादरम्यान घरचा पत्ता शोधून त्यांना तेथे सोडण्याचे काम केले जाते.

छोट्या कारणांवरून मोठा निर्णय
पळून आलेल्या बालकांचे स्वयंसेवी संस्थांकडून समुपदेशन केले जाते. यादरम्यान घरातील पालकांची भांडणे, शाळेत कमी गुण पडल्याने पालकांची नाराजी यांसारख्या किरकोळ कारणांमुळे घर सोडून येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीने सांगितले.

राज्यासह परराज्यातील संख्या लक्षणीय
विविध कारणांमुळे पळून येणाऱ्यांमध्ये राज्याच्या विविध भागांतील बालकांची संख्या मोठी आहे. यानंतर उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांतून पळून येणारे विद्यार्थी देखील तेवढेच आहेत. यामध्ये घरगुती कारणासोबतच मनसोक्त फिरण्याच्या भावनेतूनही काहीजण पळून येत असल्याचे निष्कर्षातून दिसून येत असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात आले.

दर महिन्याला 60-70 विद्यार्थी आढळून येतात
अशा लहान मुलांना सांभाळणे, समुपदेशन करून पोलिसांच्या मदतीने घरच्यांच्या हाती देण्याचे काम काही स्वयंसेवी संस्थांकडून केले जाते. पुणे स्थानक परिसरात महिन्याला अशाप्रकारे घर सोडून येणारे तब्बल 60 ते 70 विद्यार्थी आढळून येतात. यात काही विद्यार्थिनींचाही समावेश असल्याचे स्थानक परिसरात काम करणाऱ्या “साथी’ संस्थेचे प्रतिनिधी प्रसून शुक्‍ला यांनी सांगितले.

राज्यासह परराज्यातून आलेली मुले रेल्वे स्थानकावर आढळून येतात. अशा मुलांचे साथी संस्थेच्या मदतीने समुपदेशन केले जाते. त्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याचे काम केले जाते.
– डी. विकास, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे प्रशासन

जानेवारी ते डिसेंबर 2017
एकूण आढळून आलेल्यांची संख्या – 417
कुटुंबीयांच्या स्वाधीन – 371
स्वयंसेवी संस्थांकडे स्वाधीन – 46


जानेवारी ते नोव्हेंबर 2018
एकूण आढळून आलेल्यांची संख्या – 606
कुटुंबीयांच्या स्वाधीन – 504
स्वयंसेवी संस्थांकडे स्वाधीन – 102


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)