रेल्वेतील छेडछाडीला लगाम लागणार?

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये किंवा लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार नेहमीच घडतात. याबाबत रेल्वे पोलिसांकडून कडक कारवाई करूनही या प्रकाराला फारसा आळा बसलेला नाही. विशेषत: मुंबईत लोकलमध्ये छेडछाडीच्या तक्रारी सतत येत असतात. बहुतांश तक्रारीत आरोपी सापडत नाही. कारण त्याची ओळख पटवणे हे कठीण काम असते. रेल्वेच्या गर्दीचा फायदा घेत ही मंडळी छेडछाड करत असतात; परंतु यापुढे छेडछाड करणाऱ्या लोकांना त्याची जबर किंमत मोजावी लागणार आहे.

रेल्वे पोलिसांनी छेडछाड करणाऱ्यांना पकडण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक अॅप लॉंच केला आहे. अशा घटनांचे चित्रीकरण आपोआप होऊन तो व्हिडीओ आरपीएफ नियंत्रण कक्षापर्यंत थेट जाईल. त्यामुळे आरोपीला ओळखणे आणि पकडणे सोपे जाणार आहे. उपद्रवी लोकांना जरब बसवण्यासाठी विकसित केलेला अॅप आगामी काळात महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे अशा मंडळींना चाप बसवण्यासाठी महिला प्रवाशांना पॅसेंजर मोबाइल अॅप डाऊनलोड करावा लागणार आहे.

प्रवासादरम्यान जर एखादा व्यक्ती महिला प्रवाशांसमवेत असभ्य वर्तन करत असेल तर त्यावेळी केवळ हेल्प बटण दाबण्याची गरज आहे. हे बटण दाबल्यानंतर तो अॅप आपोआप एक लहान व्हिडीओ तयार करून तो नियंत्रण कक्षाला पाठवेल आणि त्याचा थांगपत्ताही कोणाला लागणार नाही. आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, अॅपमध्ये समाविष्ट असलेले हेल्प बटण दाबताच जवळच्या आरपीएफ कंट्रोल रूमला संदेश जाईल आणि त्यातून महिलेचे लोकेशन आणि रेल्वेचा क्रमांक, डबा समजेल.

गुन्हेगारांना शिक्षा
मोबाईल अॅपमध्ये तयार झालेला व्हिडिओ हा आरोपीची ओळख पटवण्यात आणि शिक्षा देण्यासाठी साह्यभूत ठरणार आहे. जर प्रवासादरम्यान इंटरनेटचा अडथळा असेल तरीही रिकॉर्ड व्हिडिओ हा इंटरनेटच कनेक्‍शन येतच कंट्रोल रुममध्ये जाईल. एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीने रेल्वेत एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी तयार केला आहे. वर्षभरापासून पुणे रेल्वे डिव्हीजनमध्ये लोकल-मेल, एक्‍स्प्रेसमध्ये या अॅपचा प्रयोग केला जात आहे.

तातडीने मदत
या अॅपची खासियत म्हणजे बटण दाबताच तीस सेंकदाचा व्हिडिओ तयार होईल आणि तो नियंत्रण कक्षाकडे जाईल. यासाठी महिला प्रवाशांना वेगळा व्हिडिओ तयार करण्याची गरज भासणार नाही. पॅसेंजर मोबाईल अॅपने आरपीएफला जीआरपीला जोडण्याची योजना आहे. महिलेस अॅलर्ट पाठवण्याबराबेरच कंट्रोल रुमजवळील आरपीएफचे पथक,जीआरपी चौकी किंवा जे काही ठाणे असेल त्याला छेडछाडीची माहिती पोचेल. जर रेल्वेतच आरपीएफ किंवा जीआरपीचे पथक असेल तर त्यांनाही या घटनेची माहिती तात्काळ मिळेल. यातून जवान तक्रारकर्त्या महिलेची तातडीने मदत करतील.

– विजयालक्ष्मी साळवी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)