रेल्वेच्या रुळाखालील रस्त्यावरच पाण्याचे तळे

रस्ता खचला : रेल्वे प्रशासन बेदखल : स्थानिक हवालदिल
कोपर्डे हवेली, दि. 1 (वार्ताहर) -शिरवडे स्टेशन जवळील रेल्वे गेट नंबर 95 बंद करुन उत्तर कोपर्डे येथे रेल्वे प्रशासनाकडून रुळाखालून बोगदा काढण्यात आला आहे. पावसाचे पाणी साठत असल्याने रेल्वे प्रशासन बेदखल असून वारंवार घडणार्‍या अपघातांमुळे स्थानिक नागरिक हवालदिल झाले आहेत.
शिरवडे स्टेशनलगत नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे ही गावे आहेत. कराड-मसूर मुख्य रस्त्यास जोडणारा हा अंतर्गत रस्ता आहे. येथे असणारे रेल्वे गेट बंद करुन रुळाखालून बोगद्याच्या रस्त्याचा पर्याय काढण्यात आला. स्थानिकांनी भविष्यात होणार्‍या गैरसोयी तसेच बोगद्याची जागा चुकीची असल्याबाबत तीव्र विरोध केला. मात्र रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नागरिकांच्या विरोधास जुमानले नाही. त्याचा परिणाम सुरुवातीच्या पावसानेच बोगद्यातील रस्त्यावर पाणी साठून राहिल्याने याचा नाहक त्रास स्थानिकांना सोसावा लागत आहे. तब्बल दिड दोन फूट पाणी साठल्याने वाहने ढकलत न्यावी लागत आहे. त्यानंतर पाणी वाहून गेल्याने गाळ साठलेला आहे. त्यात वाहने घसरत असल्याने किरकोळ अपघातांची मालिका सुरु आहे. रात्रीच्यावेळी येथे पथदिवे नसल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूलाजवळ तीव्र वळण असल्यामुळे समोरुन येणारे वाहन दिसण्यासाठी मिरर रिफ्लेक्टरची गरज आहे. या ठिकाणी छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका घडत असतानाही रेल्वे प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसते. रेल्वे लाईन रुंदीकरणात तडजोडीचे तकलादू कारण सांगण्यात येत आहे. पूलासाठी निवडण्यात आलेली जागा ही महादेव डोंगर उतारावर असल्याने पावसाळ्यात येथे पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहत आहे. याठिकाणी जमीन खोदून रेल्वे रुळांखालून 16 फूट उंचीचा पूल झाला आहे. पूलाजवळचा परिसर आधीच दलदलीचा आहे. या ठिकाणी पाणी साचल्याने त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम होत आहे. येथे पाणी वाहण्यासाठी चर खोदून फक्त स्थानिकांची समजूत घालण्याचाच प्रकार प्रशासनाकडून झाला आहे. रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे स्थानिक नागरिकांना विचारात न घेता रेल्वे प्रशासनाने केेलेल्या या पूलाची अवस्था सोय कमी आणि गैरसोयच जास्त असल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)