रेरा व जीएसटीनंतर बांधकाम उद्योगाला उज्ज्वल भवितव्य

लोणावळ्यात क्रेडाईच्या राज्यस्तरीय महाकॉन परिषदेतील सुर

पुणे, दि.20- क्रेडाई सदस्यांनी रेरा आणि जीएसटीच्या नियमांचा अभ्यास करावा. बांधकाम उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल आहे, विशेषतः परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात अशा प्रकारचा विश्वास महाकॉन या दोन दिवसीय परिषदेत व्यक्त करण्यात आला.

क्रेडाई महाराष्ट्रने या परिषदेचे आयोजन केले होते आणि 16 व 17 जून रोजी ती लोणावळा येथे पार पडली. ही पाचवी वार्षिक परिषद असून या कार्यक्रमाला 37 शहरांतील 365 पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

महाकॉनचे उद्घाटन 16 जून रोजी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे कर्ज विभागाचे राष्ट्रीय प्रमुख वैजनाथ एम. जी. यांच्या हस्ते झाले. क्रेडाई -नॅशनलचे निर्वाचित अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई – महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया हे यावेळी उपस्थित होते. क्रेडाई नॅशनलचे सचिव रोहीत राज मोदी, क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजीव पारेख, महाकॉनचे निमंत्रक गिरीश रायबागे यांचा उपस्थितामध्ये समावेश होता.

वैजनाथ यांनी ग्वाही दिली, की एसबीआय खासकरून दुसऱ्या व तिसऱ्या स्तरातील शहरांतील बांधकाम उद्योगासोबत काम करत असून परवडणाऱ्या घरांच्या बांधणीसाठी मदत पुरवत आहे. कमीत कमी व्याजदरांवर आकर्षक कर्ज पुरवून विकसकांना तसेच वैयक्तिक ग्राहकांनाही ही मदत देण्यात येत आहे.
सतीश मगर म्हणाले, की सदस्यांनी सक्रिय होऊन स्वतःमध्ये बदल घडवून आणावा आणि रेरामुळे येत असलेल्या सुधारणा घडवून आणाव्यात.

क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शंतिलाल कटारिया म्हणाले, उद्योगातील नवीनतम ज्ञान इतरांना देण्यासाठी आणि बांधकाम उद्योगात येत असलेल्या नियम व नियमनांची माहिती देण्यासाठी ही परिषद आयोजित केली आहे. रेरा आणि जीएसटीमुळे आलेल्या या संक्रमणाच्या काळात सदस्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. रेरा व जीएसटीच्या नियमांचे पालन करण्याचे त्यांनी सदस्यांना आवाहन केले.

महाराष्ट्राच्या नगर नियोजन विभागाचे संचालक विजय शेंडे यांनी समान विकास व बांधकाम नियमावलीवर भाष्य केले तसेच महाराष्ट्रातील नगर नियोजनातील येऊ घातलेल्या सुधारणांची माहितीही दिली.

महारेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी रेरा कायद्याचे विवेचन करून उपस्थितांच्या शंकांना उत्तरे दिली. चटर्जी म्हणाले, की 31 जुलै 2017 पर्यंत ताबा प्रमाणपत्र मिळणाऱ्या प्रकल्पांसाठी नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांनी सदस्यांना नोंदणीचे फायदेही स्पष्ट करून सांगितले.
शोभा ग्रुपचे उपाध्यक्ष जी. सी. शर्मा यांनी भारतात बांधकाम उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे स्पष्ट केले आणि या क्षेत्रातील वित्तीय शिस्तीच्या टीप्स दिल्या. प्रसिद्ध आर्किटेक्‍ट हाफीस कॉंट्रॅक्‍टर यांनी परवडणाऱ्या घरांबाबत दृष्टिकोन मांडला.

या दोन दिवसांच्या कार्यक्रमात परवडणारी घरे, कागदपत्रे बनवतानाची (ग्राहक/सोसायटी/अपार्टमेंट) मुख्य कलमे, व्यवसायवाढीची रणनीती, व्यापक परवडणाऱ्या घरांची बांधणी, बांधकाम व्यवसायातील आव्हाने, जीएसटीची अंमलबजावणी, गृहकर्ज आणि पंतप्रधान आवास योजना इ. विषयांवर सादरीकरणे झाली. जीएसटीची माहिती देणारे पुस्तक कटारिया यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. पुढील महाकॉन डिसेंबरमध्ये नाशिकमध्ये घेण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)