“रेन वॉटर हार्वेस्टींग’ प्रकल्पास “ग्रीन सिग्नल’

महापालिकेच्या 11 शाळा दत्तक ः पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम
– प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवणार
पिंपरी, दि. 20 (प्रतिनिधी) – महापालिका शाळांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी वाया न जावू देता ते पुन्हा जमिनीत मुरवण्यासाठी प्रायोगिक तत्वावर 11 शाळांमध्ये “रेन वॉटर हार्वेस्टींग’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. याकरिता पर्यावरण संवर्धन समितीने पुढाकार घेतला असून हा प्रकल्प राबवण्यास अतिरिक्‍त आयुक्‍त तानाजी शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
पर्यावरण संवर्धन समिती व महापालिका पर्यावरण संवर्धन पूरक अनेक उपक्रम सामंजस्य करार करून राबवले जात आहेत. शहरातील महापालिका शाळांच्या इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करून ते शास्त्रोक्‍त पद्धतीने पुन्हा जमिनीच्या गर्भात नेवून सोडण्यात येणार आहे. हा “रेन वॉटर हार्वेस्टींग’ प्रकल्प पर्यावरण संवर्धन समिती स्व-खर्चाने व त्यांच्या पुढाकारात पूर्ण होवू लागला आहे. यामध्ये शहरात महापालिकेच्या पहिल्या टप्प्यातील 11 शाळा निवडण्यात आलेल्या आहेत. या शाळांच्या इमारती पाहून त्यावर हा प्रकल्प सुरू होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात पावसाची वर्षांला सरासरी 750 मि. मी. नोंद होते. हे पावसाचे पाणी “रेन वॉटर हार्वेस्टींग’ प्रकल्पातून साधारणपणे 250 दशलक्ष लिटर जमा करून ते जमिनीत बोअरच्या माध्यमातून खोलवर नेवून सोडणार आहेत. या पाण्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमास सरासरी 12 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याना संपूर्ण अर्थ सहाय्य सामाजिक संस्था फिजर्व इंडिया प्रा. लि. कंपनी “सीएसआर’ करणार आहे. तसेच, हा प्रकल्प राबवताना शाळा इमारत व विद्यार्थ्यांना कोणतीही हानी व अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी स्वयंसेवी संस्थेने घेतली आहे.

या आहेत त्या 11 शाळा
महापालिकेच्या 11 शाळांवर “रेन वॉटर हार्वेस्टींग’ प्रकल्प राबवण्यास “ईसीए’ स्वयंसेवी संस्थेला मान्यता दिलेली आहे. यामध्ये नागू बारणे मनपा शाळा संतोषनगर, थेरगाव, कांतीलाल खिवसरा पाटील मनपा शाळा थेरगाव, आबाजी भुमकर मनपा शाळा वाकड, रमाबाई आंबेडकर मनपा शाळा अजंठानगर, लीलाबाई खिंवसरा मनपा शाळा मोहन नगर, साई जीवन मनपा शाळा चिखली, किसन भालेकर मनपा शाळा तळवडे, छत्रपती शाहु महाराज मनपा शाळा दिघी, विठ्ठलराव सोनावणे मनपा शाळा चिखली, बापदेव महाराज मनपा शाळा किवळे आणि विकास नगर मनपा शाळा किवळे या शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

महापालिकेच्या 11 शाळांच्या इमारतीमध्ये पर्यावरण संवर्धन समितीचा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. अन्य स्वयंसेवी संस्थांनी देखील आदर्श घेवून विविध प्रकल्प राबवावेत. याकरिता महापालिका सदैव सहकार्य करेल.
नितीन काळजे, महापौर.

शहराचे पर्यावरण समृध्द राहण्यासाठी इसीए संस्था कटिबद्ध आहे. पर्यावरण समस्यांचे निर्मूलनासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. प्रायोगिक तत्वावर “रेन वॉटर हार्वेस्टींग’ प्रकल्प राबवत असून यापुढेही अन्य शाळांवर तो बसवण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न करणार आहे.
– विकास पाटील, अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन समिती.

महापालिका शाळांच्या इमारतीवर प्रायोगिक तत्वावर “रेन वॉटर हार्वेस्टींग’ प्रकल्प बसवण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे. तसेच, याकरिता शाळा व्यवस्थापन कमिटीची देखील परवानगी घ्यावी लागणार आहे. सध्या 11 शाळांवर हा बसवण्यास मंजुरी दिली आहे.
– तानाजी शिंदे, अतिरिक्‍त आयुक्‍त महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)