रेणावळेत काळेश्‍वरी उत्सवास प्रारंभ

मेणवली, दि. 11 (प्रतिनिधी) – वाई तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धोम धरण जलाशयालगत रेणावळे येथील काळेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. गेली पाचसहा पिढ्यापासून रेणावळे येथील सणस कुटुंबियांनी सुरू केलेला श्री काळेश्वरी देवीच्या उत्सवाचा वारसा नव्या पिढीतील उद्योजक व समाजसेवक ज्ञानदेव बाळू सणस यांच्या कुटुंबामार्फत आजही भक्तीभावाने अखंडित जोपासला जात असून नऊ दिवस काळेश्वरी देवीचा उत्सव पश्‍चिम भागातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने पारंपरिक पद्धतीने अतिशय जल्लोषात साजरा केला जातो.
आजही धार्मिक परंपरा जपत छत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष सांगत सह्याद्रीच्या कुशीत व कृष्णेच्या तीरावर वसलेल्या रेणावळे येथील काळेश्वरी देवी पश्‍चिम भागातील सर्व सामान्य भक्तांच्या श्रद्धेचे अढळस्थान बनले आहे. प्रारंभी देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यात घटस्थापनेनंतर सलग नऊ दिवस विविध रंगरुपात काळेश्वरी देवीची पूजा बांधून विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक उपक्रमाने देवीची भक्तिभावाने दररोज उपासना केली जाते.
नऊ दिवस रोज सकाळी पहाटे काकड आरतीने सुरुवात करून सकाळी सात वाजता विधिवत होमहवन तद्‌नंतर देवीला अभिषेक व महापूजा घालून परिसरातून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचे नियोजन केले जाते तर रात्री महाआरती केली जावून 9 ते 12 नामांकित मान्यवर किर्तनकारांचे किर्तन व भजनाचा जागर कार्यक्रम घेतला जातो. दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी रेणावळे काळेश्वरी देवीचा उत्सव साजरा होत असल्याने नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी पश्‍चिम भागातून मोठ्या संख्येने भक्तगण रेणावळे गावात हजेरी लावतात.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)