रेठरे बुद्रुक येथील कृष्णाकाठची स्वच्छता

वाठार – “आपला गाव स्वच्छ गाव’ या संकल्पनेतून रेठरे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी येथील कृष्णाकाठ परिसराची स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थ तसेच तरूणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रेठरे बुद्रुक ता. कराड हे गाव सामाजिक, आर्थिक, राजकीय पटलावरती सर्वपरिचित आहे. तसेच राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. राजकारणावेळेस राजकारण व समाजकारणावेळी समाजकारणच करायचे या विचाराची देखील खूप माणसे येथे आहेत.हे विचार गावाच्या भल्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आहेत.

येथिल लक्ष प्रतिष्ठानचे प्रमुख असणारे धनंजय मोहिते यांची गावा व गावातील लोकांसाठी चांगले काहीतरी काम करण्याची सतत तळमळ असते. या तळमळीतूनच ते सतत प्रयत्नशिल असतात. सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येवून नुकतीच स्वच्छता मोहिम राबविली. गावाच्या चोहोबाजूंनी संथ वाहणारी कृष्णा नदी हे जणु रेठरेकरांना लाभलेले वरदानच आहे. येथील कृष्णा काठ म्हणजे एकप्रकारचे पर्यटनस्थळच आहे. ग्रामस्थ येथील रेठरे पूलावरून फेरफटका मारत रेंगाळत असल्याचे चित्र नेहमीच पहावयास मिळते.

-Ads-

कृष्णाकाठ स्वच्छ रहावा यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत. गत काही वर्षापूर्वी तंटामुक्त समितीने पुढाकार घेवून येथे वृक्षारोपण केले होते. परंतु देखभाल न झाल्यामुळे बरीचशी झाडे मरून गेली. येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. याची दखल घेवून लक्ष प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते गावातील लोकांनी कृष्णाकाठ परिसर स्वच्छतेसाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून हाक दिली होती, त्यास ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला.

या मोहिमे दरम्यान कृष्णाकाठ परिसराची स्वच्छता करण्यात आली. गोळा झालेल्या कचऱ्याची होळी करण्यात आली. सतत राजकीय डावपेच, प्रचारसभा आदीमध्ये गुरफटलेल्या गावात अशा सामाजिक कार्यात तरूणवर्ग उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहे, ही गोष्ट चांगली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)