महाळुंगे इंगळे-वॉटर हिटर क्षेत्रातील अग्रगण्य व प्रख्यात असलेल्या खराबवाडी येथील रेकॉल्ड थर्मो या कंपनीतील कायम 100 कामगारांना कसलीच पूर्वसूचना न देता कामावरून तडकाफडकी काढून टाकण्याचा विचित्र प्रक्रार घडला आहे. त्यामुळे कंपनी विरोधात कामगारांनी 1 नोव्हेंबरपासून कंपनी प्रवेशद्वारावर रात्रंदिवस सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज (मंगळवारी) म्हणजेच 27व्या दिवशीही सुरुच ठेवण्यात आले आहे. कंपनीतील कामगारांचे कुटुंबीय व त्यांची मुलेही या आंदोलनात सहभागी झाल्याने हे आंदोलन आणखीनच चिघळण्याची चिन्हे गडद झाली आहेत.कंपनीचे उत्पादन व यंत्र कालबाह्य झाल्याचे आणि कंपनी तोट्यात असल्याचे कारण पुढे करत कंपनीला टाळे ठोकल्याचे कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कळविले आहे. रेकॉल्ड कंपनीच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप दगडे, सरचिटणीस स्वप्नील बारमुख, उपाध्यक्ष संतोष घुले, सतीश येडे, नितीन सुतार, अजय मनसुख आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गेल्या 27 दिवसांपासून सुरुच ठेवण्यात आले आहे. दरम्यापन, कंपनीने अचानक उत्पादन प्रक्रिया घेण्याचे बंद करून कामगारांना थेट घरचा रस्ता दाखविल्याने कामगार वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून, आक्रमक झालेल्या कामगार संघटनांमध्येही संतापाची लाट उसळली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा