रॅमिल गुलिएव्ह, कोरी कार्टर, ख्रिस्तियन टेलर नवे जगज्जेते

जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत धक्‍कादायक निकालांची परंपरा सातव्या दिवशीही कायम
लंडन – जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेचा तील धक्‍कादायक निकालांची परंपरा सातव्या दिवशीही कायम राहिली. आजच्या दिवसात झालेल्या तीनही क्रीडाप्रकारांच्या अंतिम फेऱ्यांमध्ये सनसनाटी निकालांची नोंद करताना नव्या खेळाडूंनी जगज्जेतेपदाचा मान मिळविला. त्यामुळे ऍथलेटिक्‍स जगताला नव्या चेहऱ्यांची ओळख झाली, तसेच नवनवे गुणवान खेळाडू जुने विक्रम मोडीत काढण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही मिळाली.

बहुप्रतीक्षित अशा पुरुषांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत वायडे व्हॅन निकर्क आणि इसाक मकवाला या पदकांसाठी पसंती देण्यात आलेल्या दोन्ही खेळाडूंना धक्‍का देत तुर्कीच्या रॅमिल गुलिएव्हने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच सर्वांनाच अत्यंत उत्सुकता असलेल्या महिलांच्या 400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत ऑलिम्पिक विजेत्या दलिलाह मुहम्मदचे आव्हान अखेरच्या टप्प्यात मोडून काढताना अमेरिकेच्या कोरी कार्टरने पहिल्यावहिल्या जागतिक सुवर्णपदकाची निश्‍चिती केली.

त्यानंतर पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात अजिबात अपेक्षा नसलेल्या अमेरिकेच्या ख्रिस्तियन टेलरने निराशाजनक कामगिरीनंतरही सुवर्णपदक पटकावून सर्वांनाच चकित केले. बाकी सहकारी स्पर्धकांनीही त्याच्यापेक्षा निराशाजनक कामगिरी केल्यामुळे टेलरची कामगिरी सोपी झाल्याचे दिसून आले. महिलांची 200 मीटर धावण्याची शर्यत या आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या क्रीडाप्रकारात गतविजेत्या डेफनी शीपर्सने अंतिम फेरी गाठली खरी, परंतु बहामाच्या शॉन मिलरने तिच्या तोडीस तोड कामगिरीची नोंद करताना उद्याच्या अंतिम फेरीत सनसनाटी निकाल लागू शकतो, असा इशारा दिला आहे.

गुलिएव्हच्या धडाक्‍यामुळे व्हॅन निकर्कचा स्वप्नभंग
पुरुषांच्या 100 मी. शर्यतीत उत्तेजक चाचणीत दोन वेळा दोषी ठरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या जस्टिन गॅटलिनने विश्‍वविक्रमवीर व गतविजेत्या उसेन बोल्टला चकित केल्यानंतर पुरुषांच्या 200 मी. शर्यतीबद्दलची उत्सुकताही बाढली होती. आणि रॅमिल गुलिएव्हने क्रीडारसिकांची अजिबात निराशा केली नाही. वास्तविक गुलिएव्हसमोर वायडे व्हॅन निकर्क आणि इसाक मकवाला या दोन प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान होते. पोटदुखी आणि विषाणूसंसर्गातून पुनरागमन करणारा इसाक मकवाला खास टाईम ट्रायलच्या आणि नंतर उपान्त्य फेरीच्या दिव्यातून पार पडून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. तसेच याआधी 400 मी.चे सुवर्णपदक जिंकणारा आफ्रिकेचा वायडे व्हॅन निकर्क दुहेरी मुकुटासाठी प्रयत्नशील होता. परंतु रॅमिल गुलिएव्हने या दोघांनाही धक्‍का देताना आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम धाव घेतली आणि 20.09 सेकंदांत अंतिम रेषा ओलांडताना सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. वायडे व्हॅन निकर्क आणि त्रिनिदाद-टोबॅगोचा जेरीम रिचर्डस या दोघांनीही 20.11 सेकंद अशी सारखीच वेळ दिली. परंतु सूक्ष्मनिरीक्षणानंतर व्हॅन निकर्कने 20.11.106 सेकंद, तर रिचर्डसने 20.11.107 सेकंद वेळ दिल्याचे दिसून आले. त्यामुळे व्हॅन निकर्कला रौप्यपदक देण्यात आले. 1987 नंतर इतक्‍या चुरशीने खेळली गेलेली ही पहिलीच शर्यत ठरली. त्यावेळी तीनही पदक विजेत्यांनी सारखीच वेळ दिली होती.
कोरी कार्टरसमोर दलिलाह निष्प्रभ

आजच्या दिवसातील आणखी एका सनसनाटी निकालाची नोंद करताना अमेरिकेच्या कोरी कार्टरने महिलांच्या 400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत अनपेक्षित सुवर्णपदकाची कमाई केली. कोरी कार्टरने आपलीच सहकारी व ऑलिम्पिक विजेती दलिलाह मुहम्मदचे आव्हान संपुष्टात आणतानो पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदाची निश्‍चिती केली. सर्वात बाहेरच्या लेनमधून धावणाऱ्या कोरी कार्टरने बाकी स्पर्धकांकडे अजिबात न पाहता केवळ वेगवान धाव घेण्यावर लक्ष केंद्रित केले होते आणि त्याचे फळ तिला मिळाले. कोरीने 53.07 सेकंदांत अंतिम रेषा ओलांडताना जगज्जेतेपदाला गवसणी घातली. सुवर्णपदकाची खात्री असलेली दलिलाह मुहम्मद किंचित गाफील होती. परंतु त्याची शिक्षा तिला भोगावीच लागली. दलिलाहने 53.50 सेकंदांत अंतिम रेषा ओलांडताना रौप्यपदकाची निश्‍चिती केली. परंतु आपण पराभूत झालो आहे यावर तिचा विश्‍वास बसत नव्हता. कोरी कार्टरने तिच्या गळ्यात हात घालून आलिंगन देत अमेरिकेला दुहेरी यश मिळाल्याचा आनंद साजरा केल्यावर ती भानावर आली. जमैकाच्या रिस्टाना ट्रेसीने 53.74 सेकंदांत कांस्यपदकाची कमाई करताना पदकतालिकेची पूर्तता केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)