मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा
पुणे,दि.30(प्रतिनिधी)- रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने(आरबीआय)आपल्या धोरणात लवचिकता आणून सहकारी बॅंकांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मान्य करावा तसेच टीजेएसबी बॅंकेने रुपी बॅंकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव त्वरीत आरबीआयकडे सादर करावा अशा सूचना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या.

रुपी बॅंकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी मुबंईत बैठक बोलविली होती,या बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख तसेच आरबीआयचे अधिकारी,टीजेएसबी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल साठे,बॅंकेचे अध्यक्ष मेनन,रुपी बॅंकेच्या प्रशसक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित आणि सदस्य डॉ.अच्यूत हिरवे उपस्थित होते.या बैठकीत सुधीर पंडित यांनी रुपी बॅंकेच्या सध्यस्थितीची माहिती दिली तसेच बॅंकेची आर्थिक परिस्थिती सुधारत असून बॅंकेच्या विलीनीकरणासाठी आरबीआयने मंजूरी द्यावी असे ही स्पष्ट केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मंडळाने केलेल्या दोन वर्षातील कामाचे कौतूक केले तसेच आरबीआयने सहकारी बॅंकांचे राष्ट्रीयकरण बॅंकामध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भात असलेली सध्याची मार्गदर्शक तत्वे सहकारी बॅंकेबरोबर विलीनकरण करताना देखील लागू करावीत अशा सुचना केल्या तसेच टीजेएसबी बॅंकेने सुद्धा रुपी बॅंकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव लवकारलवकर आरबीआयकडे सादर करावा असे सांगितले.

आजच्या बैठकीसंदर्भात अधिक माहिती देताना प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित म्हणाले,या बैठकीमुळे रुपीच्या विलीनीकरणास गती प्राप्त होण्याची अपेक्षा आहे त्याचबरोबर सहकार कायदा कलम 88 खाली सुरु असलेली अपिल सुनावणी लवकरात लवकर पुर्ण करण्यासंबंधीच्या सूचना सुद्धा अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत त्यामुळे आजच्या बैठकीबाबत आम्ही सकारात्मक आहोत.

दरम्यान आज मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीच्या आधी आरबीआयच्या अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा रुपीच्या प्रशासकीय मंडळाची बैठक झाली.ठेव विमा महामंडळाकडून विलीनीकरण करुन घेणाऱ्या बॅंकेला जो निधी मिळतो तो योग्य तेवढा वाढवून मिळावा अशी मागणी करण्यात आली यामुळे विलीनीकरण लवकरात लवकर होण्याबरोबरच ठेवीदारांना देखील त्याचा लाभ होऊ शकेल असे ही पंडित यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)