रुपयाच्या मूल्याकडे पीएमओचे लक्ष 

पंतप्रधान कार्यालयात लवकरच आढावा बैठक; इंधन दरावरही विचार होणार 
नवी दिल्ली: रुपयाचे मूल्य गरजेपेक्षा जास्त कमी होऊ नये याकरीता पंतप्रधान कार्यालय आता सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. रुपया घसरू नये याकरीता आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितले. त्याचबरोबर या आठवड्याच्या अखेरीस या विषयावर चर्चेकरीता पंतप्रधान कार्यालयाने बैठक बोलावली असल्याचे वृत्त आहे.
काल सकाळी रुपयाचे मूल्य तब्बल 72 रुपये प्रती डॉलर या पातळीपर्यंत घसरले होते. नंतर रिझर्व्ह बॅंकेने बऱ्याच डॉलरची विक्री केल्यानंतर रुपयाचे मूल्य वाढले. काल दिवसाअखेरीस रुपयाचे मूल्य 72.69 रुपये प्रति डॉलर या पातळीवर बंद झाले.
गर्ग यानी सांगितले की, रुपया योग्य मुल्याच्या खाली घसरु नये यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सरकारचे परिस्थितीकडे बारीक लक्ष आहे. त्यांनी पुन्हा असा दावा केला की, भारतीय अर्थवयवस्था मजबूत आहे. मात्र जागतीक परिस्थिती वेगाने बदलत असल्यामुळे त्याचा रुपयावरच नाही तर सर्वच देशांच्या चलनावर परिणाम होत आहे.
अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापारी मतभेद वाढत चालले आहेत. त्याचा परिणाम चलनावर आणि क्रुडच्या किमतीवर हाते आहे. अमेरिकेने अनेक वेळा व्याजदरात वाढ केली आहे. त्याबरोबरच अमेरीका पुन्हा व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे डॉलरचे मूल्य वाढत चालले आहे. त्याचा रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत असल्याचे समजले जात आहे. या जागतिक घडामोडीचा भारतावर नकारात्मक परिणाम होत आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात भडकल्यानंतर केंद्र सरकारकडून यावरील उत्पादन शुल्क काही प्रमाणात कमी करण्याची अपेक्षा होती. मात्र वित्तीय तूट 3.3 टक्‍क्‍यांच्या आत रोखण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत शुल्क कमी करण्यास अर्थ मंत्रालयाने साफ नकार दिला आहे. यामुळे सामान्य जनतेत बराच असंतोष निर्माण झाला असून निवडणुकीच्या वर्षात इंधनाच्या किंमतीवर काहीतरी मार्ग काढण्याच्या शक्‍यतेवर या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्‍कम आहे. मात्र भारताच्या नियंत्रणाबाहेरील जागतिक कारणांमुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. मात्र हा परिणाम किमान व्हावा, यासाठी केंद्र आणि रिझर्व्ह बॅंक आवश्‍यक त्या उपाययोजना करीत आहे. भारताकडे परकीय चलनाचा पुरेसा साठा असल्यामुळे भारताला आयातीत कसल्याही अडचणी येणार नाहीत. याची काळजी घेण्यात येत आहे.
सुभाषचंद्र गर्ग, केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)