रुपयाचे मूल्य सावरता सावरेना

महागाईत वाढ होण्याची शक्‍यता; आरबीआयच्या हस्तक्षेपाचा परिणाम नाही

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने रुपयाला सावरण्यासाठी बराच हस्तक्षेप करूनही रुपयातील घसरण अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 26 पैशांनी घसरून 71.00 या नव्या नीचांकावर पोहोचला. रुपयातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घसरण आहे. गुरुवारी रुपया 70.82 वर बंद झाला होता.

रिझर्व्ह बॅंक मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री करून रुपयाला आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र तरीही ऑगस्ट महिन्यात रुपयाचे मूल्य 3.30 टक्‍क्‍यांनी घसरले आहे. सध्याच्या घडीला आशियातील सर्व देशांच्या चलनांचा विचार केल्यास रुपयाची कामगिरी सर्वात वाईट आहे.

परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे पुन्हा आकर्षित होऊ लागल्यामुळे रुपयाच्या मूल्यात सुधारणा होऊ शकते, असे भाकित अर्थ मंत्रालयाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी वर्तवले होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य वधारून ते 68 ते 70 होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्‍त केला होता. मात्र, अद्याप तरी रुपया वधारताना दिसत नाही. 2019 मध्ये रुपयाचे मूल्य 10 टक्‍क्‍यांनी घसरले आहे. त्यामुळे आयात, परदेशातील शिक्षण आणि परदेश प्रवास महागला आहे.

डॉलरला वाढलेली मागणी आणि परकीय गुंतवणूकदारांचे निधी काढण्याचे प्रमाण वाढल्याने ही घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने रिफायनरी कंपन्यांची डॉलरमध्ये मागणी वाढली आहे. त्याचबरोबर परकीय बाजारात अन्य चलनांच्या तुलनेत डॉलरच्या मजबुतीमुळेही रुपया प्रभावित झाला आहे.

रुपयाची घसरण अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे. याचा थेट परिणाम सामान्य व्यक्‍तीच्या खिशावर पडणार आहे. यामुळे फ्रिज, टीव्ही, एसी आणि लॅपटॉपसारख्या ग्राहकोपयोगी आणि इलेक्‍ट्रॉनिक साहित्याच्या किमतींमध्ये वाढ होईल. यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतील.

गेल्या काही व्यवहारांपासून रुपयासह डॉलरच्या तुलनेत अनेक आशियाई चलनांमध्ये तीव्र स्वरूपाची घसरण दिसून येत आहे. रुपयाच्या तीव्र स्वरूपातील घसरणीबाबत केंद्रातील मोदी सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे. तथापि रुपयाचे डॉलरच्या तुलनेत सत्तर पल्याड घसरणे ही प्रतिकूल जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत चलनवाढीच्या चिंतेचा संयुक्तक्‍त परिणाम असून, वास्तविक प्रभावी विनिमय दरात रुपयाचा मूल्य ऱ्हास तितकासा झालेला नाही, असा अर्थमंत्रालय आणि निती आयोगाचा दावा आहे. चालू वर्षात विदेशी संस्थांनी तब्बल 28 कोटी डॉलर भारताच्या समभाग आणि रोखे बाजारातून काढून घेतले आहेत, त्याचा रुपयाच्या मूल्यावर ताण दिसून येत आहे असे काही विश्‍लेषकांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)