रुग्णांची पंढरी विठ्ठल लहाने

दुभंगलेले ओठ आणि टाळूवर शस्त्रक्रिया करीत हजारो रुग्णांना जगण्याचे बळ देणारे डॉ. विठ्ठल लहाने हे एक आदर्श समाजशील डॉक्‍टर आहेत. माणसामध्ये शिक्षणाने खूप चांगला बदल घडू शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. जगामध्ये अशक्‍य काहीच नाही. केवळ आपण त्या विशिष्ट गोष्टीला कसे घेतो, हे आपल्यावर अवलंबून असते. मात्र, एखादी गोष्ट आपण ठरविली की, ती करायची म्हणजे करायची मग काहीही झाले तर चालेल, हा विचार आपण केला पाहिजे असे ते आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून नेहमी सांगत असतात.

आपल्या आयुष्यामध्ये प्राधान्यक्रम जपत त्यांनी त्यांच्यामध्ये कधीही बदल केलेला नाही. एमबीबीएस, एमएस आणि एमसीएच हे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च शिक्षण घेतल्यानंतर, मुंबईला खूप चांगल्या संधी उपलब्ध असतानाही केवळ आपले माय-अण्णा आणि गरिबांची प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी त्यांनी मराठवाड्यातील लातूर येथे रुग्णसेवा करण्याचे ठरविले. प्लास्टिक सर्जरी ही केवळ श्रीमंत लोकच करू शकतात. त्यामुळे आपण ही शाखा गरिबांसाठी उपलब्ध करून द्यावी हा विचार त्यांच्या तरूण मनाने केला. या विचाराला 2000 सालामध्ये लहाने हॉस्पिटलच्या रूपाने मूर्तरूप मिळाले. आयुष्यात मूल्यांना अधिक महत्व देत, ती मुल्ये जपत ते आजही सातत्यपूर्ण आणि प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकाळी पावणेपाच वाजता चालू होणारा दिवस संध्याकाळी साडेसहापर्यंत ते केवळ रुग्णसेवा करीत असतात. अत्यंत कुटुंबप्रिय असलेले लहाने आपल्या कुटुंबाला महत्व देत एका आदर्श परिवारामध्ये राहतात. आज त्यांचे संपूर्ण कुटुंब सर्वांसाठी आदर्श असे आहे.

संधीची गोष्ट सांगत डॉ. लहाने संपूर्ण देशभर प्रेरणादायी व्याख्याने आज देत आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा तिसरा प्राधान्यक्रम त्यांनी त्यांच्या आयुष्यात ठरविला आहे. ज्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत असतात. विद्यार्थ्यांची महिन्यातून आठशे पेक्षा अधिक पत्र लहाने यांना येत असतात. त्या सर्वांना लहाने उत्तर देत असतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. त्यात विद्यार्थी जीवनात तत्पर असणे, जागृत असणे, अभ्यास करणे गरजेचे असते. संधी सगळ्यांकडे येत असते. मात्र, प्रत्येकजण या संधीला ओळखून वाटचाल करेल असेच होत नाही. मात्र, लहाने यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर केला म्हणूनच डॉ.विठ्ठल लहाने हे जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन झाले.

अभ्यास हा आपल्यासाठी करायचा असतो. यातून आपण कर्तृत्ववान बनत असतो. आपल्या कर्तुत्वातून आई वडील आपोआप मोठे होत असतात. माकेगाव या लहाने यांच्या गावातून दहावीला असलेल्या दहा विद्यार्थ्यांपैकी केवळ एकटे लहाने दहावी पास झाले. मी हुशार नाही, तर कष्टकरी आहे म्हणत त्यांनी आपल्या संपूर्ण विद्यार्थी जीवनामध्ये प्रचंड अभ्यास केला. आज विठ्ठल लहाने या साधारण विद्यार्थ्याचा प्रवास जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने यांच्यापर्यंत येऊन पोचला.

परिस्थिती ही कधीही अडचण ठरत नाही. कुठल्याही परिस्थितीवर मात करून माणसाला मोठे होता येते. शिक्षणाने माणूस मोठा होत असतो. शिक्षणाने माणूस इतका मोठा होतो की, तो जिवंत असताना आणि जिवंत नसतानाही चिरकाल मोठाच राहतो. हे केवळ शिक्षणाने शक्‍य आहे. शिक्षण ही संधी असते. प्रत्येकाने या संधीचा वापर करून आयुष्याचे सोने करून घ्या. असे म्हणणाऱ्या डॉ. लहाने हे रूग्ण आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पंढरीच्या विठ्ठलाप्रमाणे श्रद्धास्थानी आहेत.

– श्रीकांत येरूळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)