रुग्णवाहिकेच्या चालकालाच डेंग्यूची लागण

  • पिंपळवंडीत आरोग्य खात्याच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह ः उपाययोजनेची मागणी

पिंपळवंडी -पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील आरोग्य खात्याच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच डेंग्यूची लागण झाली असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोग्य खात्याच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
पिंपळवंडी परिसरात रहाणाऱ्या आणि आरोग्य खात्यात काम करणाऱ्या एका रुग्णवाहिकेच्या चालकालाच डेंग्यूची लागण झाली असून हा कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून आळेफाटा येथे एका खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. या कर्मचाऱ्याला आठ दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्याच्या रक्ताची चाचणी घेतली असता त्यास डेंग्यूची लागण झाली असल्याचे आढळून आले. त्याच्यावर सध्या आळेफाटा येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. परिसरात हिवतापाची साथ सुरु असून अनेकजण हिवतापाने आजारी आहेत पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून या गवतांमुळे व साचलेल्या घाण पाण्याच्या डबक्‍यांमुळे मच्छरचे प्रमाण वाढले आहे. दिवसाही मच्छरच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत. असे असतानाही ग्रामपंचायत कार्यालयाकडून मात्र काहीच उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिकांमधुन नाराजी व्यक्त केली जात आहे. पिंपळवंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथील कर्मचाऱ्यांकडून जनजागृती व तपासणी मोहीम राबविणे गरजेचे असतानाही ते होत नाही.

  • यापूर्वीही आली होती डेंग्यूची साथ
    यापूर्वी एकदा या ठिकाणी डेंग्यूची मोठ्या प्रमाणात साथ आली होतीत्यावेळी शंभर ते सव्वाशे जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने खबदारीचा उपाय करणे गरजेचे असून ग्रामपंचायत कार्यालयाने या परिसरात गाजर गवतावर औषध फवारणी करुन गाजर गवत निर्मूलन करावे व परीसरात धुरळणी करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)