रुग्णवाहिकेचे चालक पगारापासून वंचित

  • मंचरमध्ये शंभर प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या

मंचर – शंभराहूनअधिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवरील वाहन चालक गेले सहा महिने झाले पगारापासून वंचित आहेत. वाहनचालकांच्या पगाराबाबत कंत्राटदार अथवा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी देखील लक्ष देत नाहीत, त्यामुळे या वाहनचालकांची अक्षरशः फरफट सुरू आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कायम स्वरूपी वाहन चालक भरती बंद असल्याने गेली काही वर्षे ठेकेदारांमार्फत वाहन चालकांची भरती केली गेली आहे. रात्रंदिवस रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या वाहनचालकांना गेले सहा महिने वेतन मिळालेले नाही, तसेच कामाच्या तुलनेत वेतनही अतिशय तुटपुंजे म्हणजे दरमहा फक्त सहा हजार रुपये आहे. त्यातच गेले पंधरा महिने भविष्यनिर्वाह निधीची रक्कमही वेतनातून वसूल केलेली दाखविली जाते; पण भविष्यनिर्वाह निधीचा खाते क्रमांकही अद्याप संबंधितांना दिलेला नाही. दिवस-रात्र काम करूनही आर्थिक कोंडी झाल्याने अनेक वाहन चालकांमध्ये नकारात्मकता वाढीस लागली आहे. आर्थिक विवंचनेने केवळ वाहनचालकच नव्हे तर त्यांचे कुटुंबियही ग्रासलेले आहे. मुलांची शिक्षणे, घरातील वयोवृद्धांचे औषधोपचार इत्यादी खर्चाची तोंडमिळवणी कशी करावी, हा सर्व कंत्राटी वाहन चालकांसमोर यक्ष प्रश्न आहे. निदान येत्या मार्चअखेरीस तरी थकीत वेतन मिळावे, अशी अपेक्षा यावेळी वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.

  • काम बंद आंदोलन होणार
    वाहन चालक लवकरच पगारासाठी “काम बंद आंदोलन’ पुकारत असून, हे आंदोलन जिल्हाभर केले जाणार आहे.वाहनचालकांच्या आंदोलनामुळे रुग्ण सेवेचा बोजवारा उडेल, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. वाहन चालकांच्या या प्रश्नाकडे ना जिल्हा परिषदेचे अधिकारी गांभीर्याने पहात आहेत, ना पदाधिकारी. यामुळे दाद कोणाकडे मागायची, या विवंचनेत रुग्णवाहिकेवरील वाहन चालक आपले जीवन कंठीत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)