रुग्णवाहिका; सेवा नव्हे, गोरख धंदा!

महादेव वाघमारे

तळेगाव दाभाडे – मावळ तालुक्‍यातून द्रूतगती मार्ग आणि जुना महामार्ग जातो. येथे अपघातांचे प्रमाणही इतर तालुक्‍यांच्या तुलनेत खूप अधिक आहे. मावळ तालुक्‍यातील वडगाव, तळेगाव दाभाडे व सोमाटणे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असतानाही अपघातात जखमी झालेल्यांना काही रुग्णवाहिका चालक थेट निगडी, आकुर्डी, पिंपरी आणि चिंचवडमध्ये घेऊन जातात. रुग्णालयांकडून मिळणाऱ्या टक्‍केवारीसाठी चालक जखमींच्या जिवाशी खेळ करत लांबची वाट धरतात. स्थानिक स्तरावरून रुग्णवाहिका चालकांवर गंभीर आरोप होत आहेत. स्थानिकांच्या मते जवळच हॉस्पिटल असताना देखील मुद्दाम लांब घेऊन जात असल्याने मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो आणि वाया गेलेला वेळ कित्येकदा जखमींच्या जिवावर बेततो. पुणे-मुंबई द्रूतगती व महामार्गावरील अपघातातील जखमींना काही रुग्णवाहिका चालक अधिकची टक्केवारी मिळत असल्याने निगडी, आकुर्डी व चिंचवड परिसरातील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल करतात.

येथे रोजच अपघात होतात. अपघात क्षेत्र हद्दीत जागोजागी रुग्णवाहिका थांबलेल्या असतात. जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने त्यांचा उपचारा अभावी मृत्य होत असल्याच्या घटनात वाढ होत आहे. जखमींना तालुक्‍यातील जवळच्या रुग्णालयातच दाखल करावे, अशी मागणी आहे. मावळातील जखमी जर निगडी, आकुर्डी व चिंचवड परिसरातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असेल तर त्यांच्या नातेवाईकांना वेळेत भेटता येत नाही. जखमींवर शस्त्रक्रिया करायची असल्यास बील कोण भरणार? यामुळे जखमींवर शस्त्रक्रिया वेळेत होत नाही. त्यातच गरीब जखमी रुग्ण असेल तर त्यावर तात्पुरता उपचार करून हाकलून दिले जाते. अपघातातील जखमी रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळाल्यावरच त्याचा जीव वाचण्याची शक्‍यता अधिक असते. निगडी, आकुर्डी व चिंचवड परिसरातील हॉस्पिटल रुग्णवाहिका चालकांना अधिकची टक्केवारी देते. टक्‍केवारीच्या आमिषाने मावळातील काही रुग्णवाहिका चालक जखमी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे.

सामाजिक संघटनांची कारवाईची मागणी
सध्या मावळ परिसरात हा प्रकार इतका अधिक वाढला आहे की स्थानिक पातळीवरुन याविरुद्ध आवाज उठू लागला आहे. काही सामाजिक संघटनांनी तर अशा रुग्णवाहिका चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अपघात झाल्यावर हाकेच्या अंतरावरील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येच वैद्यकीय उपचारासाठी दाखल करावे. टक्केवारीसाठी रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या रुग्णवाहिका चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटी संस्थापक विलास काळोखे, ऍड. मच्छिंद्र घोजगे, सोमा भेगडे, आशिष खांडगे, सागर पवार, संजय मेहता, विक्रम कलावडे, विशाल वहिले, दिनेश पगडे आदींनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)