रुग्णवाहिका मोजताहेत “अखेरच्या घटका’

पिंपरी – रुग्णांसाठी रात्री-अपरात्री “देवदूत’ ठरणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या रुग्णवाहिका शेवटच्या घटका मोजत आहेत. रुग्णवाहिकांमधील औषधोपचार पेटीची दूरवस्था, खराब झालेला पत्रा, तुटलेल्या अवस्थेतील वायपर, सायरन, ऑक्‍सिजन किटचा अभाव अशा परिस्थितीत रुग्णांची ने-आण केली जात आहे. यामुळे, अत्यावश्‍यक रुग्ण नेताना रुग्णांच्या नातेवाईकांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे.

पिंपरी शहरातील वायसीएम रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात येते. परंतु, या रुग्णालयातील रुग्णवाहिकांची संख्या केवळ 9 असून यामधील चार रुग्णवाहिका सुस्थितीत आहेत. या रुग्णालयाचा आवाका पाहता या ठिकाणी वीसहून अधिक रुग्णवाहिकांची आवश्‍यकता आहे. तसेच, ही वाहने महिनाभर धुतली जात नसल्याने रुग्णवाहिकेत दुर्गंधी पसरलेली आहे. महापालिका विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे आयोजित करते. मात्र, या ठिकाणीही शिबिराचे साहित्य त्याच अवस्थेतील रुग्णवाहिकेतून घेऊन जात असल्याचा प्रकार घडत आहे.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील सर्व रुग्णवाहिका जुन्यातील असून एकही रुग्णवाहिका अत्याधुनिक नाहीत. यामुळे, एखाद्या रुग्णाला अत्यावश्‍यक स्थितीत आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. चिंताजनक रुग्ण आणताना गर्दीतून लवकर वाट मिळण्यासाठी सायरन बसविलेला असतो. मात्र, या रुग्णवाहिकांचा सायरन मध्येच बंद पडत असल्याची “चिंताजनक’ स्थिती रुग्णवाहिकांची झाली आहे. या रुग्णवाहिकांवर मानधन तत्वावर दहा तर कायमस्वरुपी 15 चालक कार्यरत आहेत. परंतु, रुग्णवाहिकांची दूरवस्था झाल्याने चालकांनाही जीवावर उदार होऊन वाहिका चालवावी लागत आहे.

रुग्णवाहिकांमधून रात्री-अपरात्री रुग्ण नेले जात असल्याने सायरन, वायपर, औषधोपचार पेटी, फाटलेल्या सीट, चांगल्या प्रकारचे स्ट्रेचर उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. तसेच, वायसीएम रुग्णालयातील रुग्णांची संख्या बघता रुग्णवाहिकांना सुस्थितीत आणणे आवश्‍यक आहे. रुग्णवाहिका विभागातील सुरज लखन म्हणाले, नवीन रुग्णवाहिकांबाबत संबंधितांना कळविण्यात आले आहे. तसेच, काही रुग्णवाहिकांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

रुग्णवाहिका शेवटच्या गावापर्यत पोचणार का?
वायसीएम रुग्णालयाच्या रुग्णवाहिका राज्यभरात कुठेही रुग्णांसाठी उपलब्ध केल्या जात होत्या. परंतु, मागील काही वर्षापासून वायसीएमच्या रुग्णवाहिका केवळ जिल्ह्यातील रुग्णांसाठी उपलब्ध असतात. परंतु, सध्याची रुग्णवाहिकांची स्थिती पाहता जिल्ह्याच्या शेवटच्या गावापर्यत पोचणार का अशी दुर्देवी परिस्थिती आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरात-लवकर रुग्णवाहिका सुस्थितीत आणण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)