रिसेलचे घर घेणे फायदेशीर (भाग-१)

राहण्यासाठी घर घेताना बाजारभाव आणि बजेटचे गणित जमत नसल्यास रिसेलचे घर घेणे अनेक दृष्टींनी फायद्याचे ठरते. एकतर लगेच ताबा मिळत असल्यामुळे एकीकडे बॅंकेचे हप्ते आणि दुसरीकडे घरभाडे हा दुहेरी खर्च टळतो. शिवाय, अनेक उपकरणे, फिटिंग्ज तयार असतात. मात्र, रिसेलचे घर खरेदी करताना काही गोष्टींची पडताळणी करणेही गरजेचे असते.

स्वतःचे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक असते; परंतु घरांच्या किमती आणि आपले बजेट याचा ताळमेळ बसेलच असे नाही. शिवाय बांधकामखर्च सतत वाढत असल्यामुळे घरांच्या किमतीही वाढतच असतात. अशा वेळी नव्यासारखेच रिसेलचे घर मिळते का, यावर लक्ष ठेवले तर घराचे स्वप्न लवकर साकार होऊ शकते. काही जणांना फ्लॅट विकत घ्यायचा असतो; परंतु सुरू असलेला एखादा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत वाट पाहायला सवड नसते. काही वेळा ज्या विभागात सर्व आवश्‍यक सुविधा उपलब्ध आहेत, अशा भागात घर हवे असे आपल्याला वाटते. अशा वेळी रिसेलचे घर घेण्याचा पर्याय चांगला.

रिसेलचे घर घेण्यातील पहिला फायदा म्हणजे वेळेची आणि पैशांची होणारी बचत. भाड्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना एक समस्या सतत सतावत असते. ती म्हणजे, घराचे वाढते भाडे. अशा वेळी परवडणाऱ्या भाडेदरात मिळणारे घर ताब्यात घेण्यासाठी अनेकदा घरे बदलावी लागतात आणि दमछाक होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठीसुद्धा रिसेलचे घर घेण्याचा पर्याय उपयुक्त ठरतो. नव्याकोऱ्या घरांपेक्षा रिसेलच्या घरांच्या किमती कमी असतात. त्याबरोबरच अशा घरांचा ताबा घेऊन लगेच तिथे राहायला जाणे शक्‍य असते, हा दुसरा फायदा. नव्या घरांच्या तुलनेत रिसेल घरांच्या किमती सात ते दहा टक्‍क्‍यांनी कमी असतात. त्यातील अनेक घरे अगदी नव्यासारखी असतात. असे घर स्वस्तात खरेदी करून बचत झालेल्या रकमेतून आपण त्या घराची अंतर्गत सजावट करू शकतो.

रिसेलचे घर घेणे फायदेशीर (भाग-२)

रिअल इस्टेट बाजारात ज्यावेळी काहीशी मंदीची स्थिती असते, अशा कालावधीत रिसेल घरांच्या किमती आणखी कमी होतात, हा अशी घरे घेण्याचा आणखी एक फायदा असतो. घरांच्या बाजारपेठेत जितकी अधिक मंदी असेल, तितकी रिसेल घरांवर अधिक सूट मिळू शकते. बाजारातील तेजी पाहून काहीजण बऱ्याच मिळकती विकत घेऊन ठेवतात. चांगला दर आल्यानंतर भक्कम नफा कमावण्याची त्यांची इच्छा असते; परंतु जर बाजारात मंदी आली, तर ते आपली गुंतवणूक फार काळ अडकवून ठेवू शकत नाहीत. अशा वेळी ही घरे आणखी कमी किमतीत मिळतात. सूट जाहीर केल्यामुळे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि रिसेलचा फ्लॅट कमी दरात विकत घेण्यास ते उत्सुक असतात.

– कमलेश गिरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)