“रिलायन्स’च्या कामापुढे अधिकारी “रिलॅक्‍स्‌’

सासवड-वनपुरी रस्त्यालगत खोदाई; लावलेली झाडेही दोन महिन्यात जळाली

सासवड- सासवड वनपुरी रस्त्याच्या दुतर्फा रिलायन्स जिओ कंपनीने केलेल्या खोदकामात झालेल्या झाडांच्या नुकसानी बाबत वारंवार सामाजिक वनीकरण विभागातील अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. “प्रभात’मध्ये वृत्त आल्यानंतर कारवाईचे नाटक करीत तात्पुरती 15 ते 20 कोवळी रोपे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही रोपेही जळून खाक झाली आहेत. रिलायन्स कंपनीकडून बेकायदा काम सुरू असतानाही वनअधिकारी मात्र रिलॅक्‍स्‌ असल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पर्यावरण संरक्षण संघटनांनी दिला आहे.

पुरंदर तालुक्‍यातील सामाजिक वनीकरण विभाग हा अनागोंदी कारभाराबाबत नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सासवड-यवत रस्त्यालगत रिलायन्स जिओ कंपनीने कुठलीही परवानगी न घेता खोदाई केली. या खोदकामात रस्त्यालगत असलेली शासकीय मालकीच्या झाडांचेही नुकसान झाले. याबाबत “प्रभात’ने सर्वात प्रथम वृत्त दिले. त्यानंतर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पाच दिवसानंतर नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम उरकण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कारवाई करण्याचे सोडून कागदी घोडे नाचवले.

सरतेशेवटी संबंधित कंत्राटदारांना नोटीस बजावण्याचे सांगण्यात आले. तर, पुन्हा नव्याने झाडे लावली गेली. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच ही रोपे पाण्याअभावी जळून गेली आहेत.
पुरंदर तालुक्‍याच्या वनविभागाने अतिशय तत्परता दाखविण्याचा फार्स रचला असला तरी भर उन्हाळ्यात तसेच दुष्काळीस्थितीत रोपे लावण्याचा निर्णय योग्य नाही. तीव्र उन्हाळ्यात रोपे लावली तरी ती जगवण्याकरिता काय काळजी घेतली, याचेही उत्तर वनविभागाकडे नाही. यामुळे हा विभाग काय कामाचा, असाही सवाल नागरिकांसह वृक्षप्रेमींकडून विचारला जात आहे.

  • रस्त्यालगतच्या झाडांचे महत्त्व…
    पुणे-पंढरपूर मार्ग हा राष्ट्रीय पालखी महामार्ग म्हणून केंद्र सरकारकडे वर्ग झाल्यानंतर या महामार्गाच्या रुंदीकरणावेळी रस्त्याकडेला असलेल्या शेकडो मोठे वृक्ष तोडण्यात आले. या बदल्यात सासवड-यवत रस्त्याच्या दुतर्फा संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाने वृक्षारोपण केले. मात्र, रिलायन्स जिओ कंपनीने खोदकामात या झाडांचेही नुकसान केले. सामाजिक वनीकरण विभागाच्या अशा कारभारामुळे कोट्यवधी रुपयांच्या निधी वाया गेला आहे.
  • मी परिक्षाविधीन नियुक्तीवर असून सध्या पुणे येथे प्रशिक्षणात आहे. माझा पूर्ण वेळ याच कामात जात असल्याने माहिती घेवून कार्यवाही केली जाईल.
    – महेश गारगोटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सासवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)