रिलायन्सचे बाजारमूल्य गेले तब्बल 8 लाख कोटी रुपयांवर

निर्देशांकांसाठी रोजचा दिवस नव्या विक्रमांचा

मुंबई: व्यापारयुद्धामुळे जागतीक वातावरण गढूळ झाले आहे. त्याचबरोबर भारतातील शेअरबाजारांचे निर्देशांक आवश्‍यकतेपेक्षा जास्त वाढले असल्याची कुणकुण सुरू झाली आहे. मात्र तरीही बरीच खरेदी झाल्यामुळे गुरुवारी शेअरबाजार निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले. गेल्या चार दिवसांपासून निर्देशांक एकतर्फी वाढत आहेत. गुरुवारी एल ऍण्ड टी रिलायन्स आणि एनटीपीसी या बड्या कंपन्याच्या शेअरची जास्त खरेदी झाली.

-Ads-

मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 38487 अंकापर्यंत वाढला होता. मात्र नंतर नफेखोरी झाली आणि बाजार बंद होतांना सेन्सेक्‍स परवाच्या तुलनेत 51 अंकांनी म्हणजे 0.13 टक्‍क्‍यांनी वाढून 38336 अंकावर बंद झाला. गेल्या तीन सत्रात सेन्सेक्‍स 633 अंकानी वाढला आहे. काल शेअर बाजार धार्मिक कारणामुळे बंद होते. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 11 अंकानी वाढून 11582 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला.

महत्वाची बाब म्हणजे जागतिक वातावरण खराब असून आणि रुपयाचे मुल्य कमी झाले असूनही परवा परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 254 कोटी रुपयांच्या शेअरी खरेदी केली. त्याचबरोबर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनीही 197 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र आता निर्देशांक फार उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार फारच सावध असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे वारंवार खरेदी आणि विकीच्या लाटा बाजारात येत आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आज मैलाचा दगड पार केला आहे. रिलायन्सचे बाजार भांडवल तब्बल 8 लाख कोटींवर पोहोचले आहे. हा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली कंपनी बनली असून टीसीएस अद्याप 26 हजार कोटींनी मागे आहे.

गुरुवारी रिलायन्स कंपनीचा शेअर 1.86 टक्‍क्‍यांची वाढ नोंदवत 1269 रुपयांवर जाऊन पोहोचला. 11 वर्षांनंतर 12 जुलैला रिलायन्सने दुसऱ्यांदा 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला होता. आता रिलायन्सच्या जवळ असलेली कंपनी आयटी क्षेत्रातील टीसीएस ही एकमेव आहे. मात्र, रिलायन्स वेगाने पुढे सरकत आहे. टीसीएसचे बाजार मूल्य 7.79 लाख कोटी रुपये आहे. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या सर्वसाधारण सभेवेळी सांगितले होते की, 2025 पर्यंत रिलायन्स दुप्पट विस्तार करण्याचे स्वप्न पाहात आहे. रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या एक वर्षात 60 टक्‍के वाढ झाली आहे. तर याच कालावधीत टीसीएसचे शेअर्स 63 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचे दिसून येते.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)