रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई

शिवनेरी – नवनवीन युक्‍त्या वापरून वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी तितक्‍याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा साह्याने वीज चोरांचा छडा लावण्यास महावितरणच्या वतीने प्रारंभ झाला असून आळेफाटा उपविभागीय कार्यालय अंतर्गत वीस ग्राहकांवर कारवाईचा बडगा महावितरणने उचलला असून यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.
आकडे टाकून वीजचोरी या नेहमीच्या वीजचोरी पद्धती बरोबरच अलीकडच्या काळात वीजचोर विविध क्‍लृप्त्या वापरून वीज चोरी करत असल्याचे काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर महावितरणच्या आळेफाटा उपविभागांतर्गत गेल्या आठवड्यापासून कारवाईस प्रारंभ झाला आहे. यासाठी कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये उपकार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे, सहायक अभियंता विशाल नाईकनवरे, श्रीशैल्य लोहारे, रोहित गांधी, लेखा विभागाचे महेंद्र पैठणे, एम. आर. काळे, लक्ष्मीकांत लिंगायत, विवेक लव्हाळे, राहुल लालगुडे आदींचा समावेश आहे.
या पथकाने पहिल्या टप्प्यात ओतुर शहर शाखांतर्गत मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या 20 ग्राहकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तसेच यापुढे देखील ही कारवाई नियमित सुरू राहणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे यांनी सांगीतले. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे, तर अशा प्रकारे वीजचोरी करणाऱ्या व्यक्तींची माहिती सुजाण नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयास कळवावी, असे आवाहन गुणवत्ता आणि नियंत्रण विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल नाईकनवरे यांनी केले आहे. या वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांमधे काही बड्या आणि सुशिक्षित तसेच प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश आहे.

  • वीजचोरी करणे हे अपघातास निमंत्रण देण्यासारखे आहे, तसेच हा गंभीर स्वरूपाचा दंडनीय गुन्हा आहे, तरी ग्राहकांनी वीजचोरी न करता प्रामाणिकपणे आणि गरजेपुरता वीज वापर करावा. वीज चोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई यापुढे नियमित सुरू राहील.
    – श्रीकांत लोथे, उपकार्यकारी अभियंता, आळेफाटा
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)