रिमा नव्हे.. ती तर आमची नयन भडभडे!

हुजूरपागातील शिक्षकांनी जागवल्या रिमा लागू यांच्या आठवणी

पुणे – अतिशय शांत, कसलाही गर्व नसणारी, नाटकांमध्ये भाग घेण्यात कायम पुढे असणारी वसतिगृहात राहून काहीशी होमसिक झालेली रिमा… नव्हे नयन भडभडे, तिच्या जाण्याची बातमी ऐकून खूप वाईट वाटलं असल्याची प्रतिक्रिया हुजूरपागाच्या माजी शिक्षिका सुमती आपटे यांनी दिली.
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या शाळेतील शिक्षिका सुमती आपटे यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी दैनिक प्रभातला सांगितल्या.
आपटे म्हणाल्या, “” 1970 ते 74 मध्ये नयन ही आमच्या हुजूरपागा शाळेत होती. इयत्ता आठवी ते अकरावीचे शिक्षण तिने आमच्या शाळेत घेतले. ही आमच्या वसतिगृहातच रहायची. वसतिगृहात रहात असताना ती घरची आठवण येत असल्याचे सांगायची. तिची आई मंदाकिनी भडभडे याही नाटकात काम करत असल्यामुळे तिलाही नाटकाची आवड होती. शाळेच्या जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धा तसेच आंतरशालेय स्पर्धांमध्ये नयन नेहमी सहभागी व्हायची. मला आठवतेय तिने नटसम्राट नाटकाचा एक भाग आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात सादर केला होता. आमची मुलींची शाळा असल्याने मुलांच्या भूमिकाही मुलीच करत. शाळेमध्ये असताना ती बऱ्याचदा नाटकात पुरुषी भूमिका करत. तिचा आवाज थोडा जाड असल्याने ती तिला मिळूनही जात. त्यावेळी तिने अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती. तसेच वीज मिळाली धरतीला हे नाटकही तिने केल्याचे मला आठवते आहे. नयन पहिल्यापासूनच नाटकात पुढे होती मात्र ती अभ्यासातही तितकीच हुशार होती. खेळात तिला फारसा रस नव्हता. अभिनेत्री झाल्यानंतर मुंबईला मला एके दिवशी भेटली व तिने त्यावेळी भर रस्त्यात मला वाकून नमस्कार केला होता ही गोष्ट मला अजुनही आठवते आहे. तिने इतक्‍या लवकर जायला नका होतं.”
तर गणित व मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षिका जयश्री बापट म्हणाल्या, “”रिमा लागू यांनी शाळेला नाटकात खूप बक्षीसे मिळवून दिली. त्यांना स्वत:लाही खूप बक्षीसे मिळाली. शाळेचं कोणतही नाटक हे रिमा लागू शिवाय पूर्ण व्हायचं नाही इतका त्यांनी त्यावेळी नाटकांमध्ये आपला ठसा उमटवला होता. कालबुलीवाला या नाटकात काबुलीवाल्याची त्यांची भूमिका ही आजही आम्हाला आठवते. त्यांनी ती इतकी उत्तमप्रमारे बजावली होती की ते नाटक पहाताना प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले होते. शाळेचा नव्वदाव्या वाढदिवशी त्यांना अतिथी म्हणून बोलवले असता त्यांनी नटसम्राटमधील काही भाग करुन दाखवला होता. मराठी बरोबरच त्यांचे हिंदीवरही खूप प्रभुत्व होतं. त्या दोन्ही भाषांमधील त्यांचे उच्चार स्पष्ट होते. शाळेकडून कधी निमंत्रण दिलं तर त्या शाळेला भेट द्यायला येत असत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)