रिमझिम पावसात निघाली सोपानकाकांची पालखी

माऊली-माऊलीच्या गजराने सासवडनगरी भक्‍तीमय

– एन. आर. जगताप

सासवड –
करीती जयजयकार
नामजोशी अंबर गर्जे तसे
आनंदे वैष्णव हरी कथा ऐकती
जाती नाचताती प्रेमछंदे
नारद तुंबर भक्त पुंडलिक
वैष्णव आणिक नाम गाती
सोपान आनंदे समाधी बैसला
एका जनार्दनी केला जयजयकार
अशा ओवी गात संत सोपानदेवांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. रिमझिम पावसाच्या सरी व माऊली-माऊलीच्या गजराने सासवडनगरी माऊलीमय झाली होती. पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी समस्त वारकरी आतुर झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. भेटी लागी जीवा लागलेसी आस या

भावनेनेच दुपारी 1.45च्या सुमारास जेजुरी नाक्‍यावर हजारो भाविकांनी पालखीला निरोप दिल्यानंतर हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. रविवारी मंदिरात पाहटेपासून काकड आरती, महापूजा व धार्मिक विधी झाले. त्यानंतर पहाटे पाचपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचा सासवड येथे मुक्काम असल्याने संत सोपानदेवांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

सकाळी 11नंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मानाच्या दिंड्या दक्षिण दरवाजाने मंदिरात घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्व दिंडीप्रमुखांचे मानाचे अभंग झाले. याचदरम्यान देवस्थान प्रमुख गोपाळ गोसावी यांच्या देवघरातील सुवासिंनीनी औक्षण केले. मानकरी अण्णासाहेब केंजळे महाराज, गोपाळ गोसावी, सोहळाप्रमुख श्रीकांत गोसावी यांनी देवघरातून सोपानकाकांच्या पादुका आणून वीणा मंडपातील पालखीमध्ये विधिवत स्थानपन्न केल्या.

सोपानकाका बॅंकेच्या वतीने या वर्षी प्रत्येक दिंडीचा संत सोपानकाकांचे फोटो, श्रीफळ व पंचा देऊन सत्कार करण्यात आला. दुपारी पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन उत्तरेकडील दरवाजातून देऊळवाड्यातून बाहेर पडली. या वेळी उपस्थित असंख्य भाविकांनी माऊली व सोपानकाकांचा जयघोष केला. पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी समाधी मंदिरात सोपानकाका बॅंकेचे अध्यक्ष व कॉंग्रेसचे जिल्हाल्हाध्यक्ष संजय जगताप, आमदार विजय शिवतारे, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक तसेच संत सोपानकाका बॅंकेचे कर्मचारी उपस्थित होते.

पालखी समवेत 97 दिंड्या
संत सोपानदेवांच्या पालखीसमवेत 97 दिंड्या असून रथापुढे 27 व रथामागे 70 दिंड्या मार्गक्रमण करणार आहेत. पालखीच्या फुलांची सोपानकाका बॅंकेच्या वतीने दररोज रथाला फुलांची सजावट करण्यात येणार आहे. रथासाठी सोरटेवाडीच्या केंजळे परिवाराच्या बैलजोडीचा मान असून अंजनगावचे परकाळे यांचा अश्‍व तर नितीन कुलकर्णी यांचा नगारखाना पालखीसमवेत मार्गक्रमण करीत आहे.

स्व. चंदुकाकांच्या स्मरणार्थ अश्‍व
माजी आमदार सहकार महर्षी स्व. चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी “मल्हार’ नावाचा अतिशय रूबाबदार आणि देखणा पंचकल्याणी अश्‍व अर्पण केला आहे. या अश्‍वाचा वर्षभराचा संपूर्ण खर्च संत सोपानकाका बॅंकेच्या वतीने करण्यात येणार आहे. आजच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे “मल्हार’ अश्‍व विशेष आकर्षण बनला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)