रिफेक्‍टरी येथील जागेत आंदोलन करण्यास मज्जाव

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनिकेत कॅंटीन व रिफेक्‍टरी येथील 100 मीटर परिसरात यापुढे सभा, आंदोलन, धरणे, जागृती जत्था, पथनाट्य, उपोषण करण्यास बंदी घातली आहे. त्यानंतरही आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. आता आंदोलने, उपोषणासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील मोकळी जागा निश्‍चित केली आहे. त्याच ठिकाणी आंदोलन करण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत.

देश अथवा राज्य सरकारने घेतलेल्या एखाद्या निर्णयावरून काही वाद निर्माण झाल्यास, त्याचे पडसाद विद्यापीठात उमटतात. विद्यार्थी विरोधी काही निर्णय होत असल्यास, त्याचा निषेध करण्यास विविध विद्यार्थी संघटना निषेध सभा, आंदोलन करून त्याकडे लक्ष वेधून घेतात. त्यासाठी विद्यापीठातील अनिकेत कॅंटीन व रिफेक्‍टरी ही ठिकाणी निश्‍चित असतात. देशात काही घडल्यास, एक-दोन दिवसांत या परिसरात आंदोलन, सभा होतात. मात्र, आता विद्यापीठाच्या नव्या निर्णयामुळे या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही. या निर्णयावरून विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या सर्व पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाचे आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास, अशा संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे. या अटीचे विद्यापीठाने पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विविध विद्यार्थी, कामगार व सामाजिक संघटनांसाठी सभा, आंदोलने, धरणे, उपोषणे, पथनाट्य यासाठी मुख्य इमारतीजवळील संविधान स्मारकाशेजारील मोकळी जागा निश्‍चित करण्यात आली आहे. या ठिकाणीच विद्यार्थ्यांना आंदोलने, उपोषण करणे आवश्‍यक आहे. अन्यत्र आंदोलन केल्यास, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)