“रिपोर्ट कार्ड’द्वारे अधिकाऱ्यांचे “मूल्यमापन’

सत्ताधाऱ्यांच्या हालचाली : वर्षभरातील कामकाजाचा होणार लेखाजोखा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत विकास कामांना “गती’ देण्यास प्रशासनातील काही अधिकारी हयगय करीत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरातील सर्वच प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करुन “रिपोर्ट कार्ड’ तयार करण्यात येईल. त्याद्वारे आपल्या कर्तव्यात कसूर करुन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संकेत सत्ताधारी भाजपाचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. “भ्रष्टाचारमुक्‍त आणि पारदर्शी’ कारभाराचे आश्‍वासन भाजपा नेत्यांनी निवडणुकीच्या काळात दिले होते. तसेच, विकास कामांना गती देण्याचे अभिवचनही पिंपरी-चिंचवडकरांना दिले होते. गेल्या वर्षभरात सत्ताधाऱ्यांनी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे. तत्कालीन स्थायी समितीच्या माध्यमातून विक्रमी विकास कामांना चालना देण्यात आली. मात्र, शहरातील मंजूर विकास कामांच्या “वर्क ऑर्डर’ (कार्यारंभ आदेश) काढल्या असतानाही काही विकास कामांना सुरूवात झालेली नाही. तसेच, काही विकास कामांचे भूमीपूजन झाले असताना अद्याप काम दिसत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपामधील पदाधिकाऱ्यांकडे नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

दरम्यान, शहरातील पाणी समस्या, अनधिकृत फ्लेक्‍स, अनधिकृत बांधकाम कारवाई आदी समस्यांबाबत प्रशासनाविरोधातील तक्रारी वाढल्या असताना संबंधित विभागाचे अधिकारी मात्र सर्व “अलबेल’ असल्याचे भासवत आहेत. परिणामी, सत्ताधारी भाजपाविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. याची पक्षीय पातळीवर गंभीर दखल घेतली असून, नागरी समस्या अथवा प्रमुख विकास कामांत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना “दणका’ दिला जाणार आहे, असे संकेत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले आहेत.

प्रशासन-सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव?
महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकांना प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली होती. अनधिकृत फ्लेक्‍सबाबत नगरसेवक तुषार कामठे यांनी आंदोलन केले होते. तसेच, पाणीपट्टी दरवाढीविरोधात भाजपच्या सुमारे सहा नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला होता. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी संत तुकारामनगर येथील भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांनी पाणी समस्येबाबत पाण्याच्या टाकीवर चढून “शोले स्टाईल’ आंदोलन केले. तसेच, भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांची महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करुन काही प्रकरणांमध्ये चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, सल्लागार नेमणुकीबाबत गेल्या वर्षभरातील भूमिकाही भाजप नेत्यांनी बदलली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)