रिडींग ठेकेदाराकडे…वसुली वायरमनकडे..!

वीज वितरण कंपनीचा सावळा गोंधळ

उमेश सुतार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड – महावितरण विज मंडळाने मीटर रिडींग करण्यासाठी ठेकेदार, वसुलीसाठी वायरमन तर बिलांसाठी कार्यालय अशा तिहेरी भूमिकेमुळे विद्युत मंडळाचे ग्राहक व शेतकरी यांना बिलातील चुका, वाढीव वीजबीले, प्रलंबित कनेक्‍शन तर काही ग्राहकांना चक्क दोन-दोन महिन्याची एका वेळी बिले देवून जोराचा धक्का दिला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून वीज मंडळाच्या या सावळ्या गोंधळामुळे “आंधळं दळतं, अन कुत्र पीठ खातं’ अशीच अवस्था निर्माण झाली आहे.

कराड तालुक्‍यात विद्युत मंडळाचे दक्षिण व उत्तर असे दोन विभागामार्फत काम चालते. कराड दक्षिणमध्ये ग्रामीण भागातील गावामध्ये विद्युत मंडळाचे काम फक्त बील वसुलीमुळेच राहीले असून त्याला अधिकारीच जबाबदार आहेत. गावातील बिलांचे रिडींग ठेकेदार घेतात, परंतु ही बीले तयार करताना बिलाची रक्कम रुपयात येण्याऐवजी लाखात येवू लागली आहे. लाखात आलेले बील बघून ग्राहकाला धक्काच बसत आहे.

त्यामुळे ग्राहक कार्यालयाकडे धाव घेवू लागला आहे. मात्र कार्यालयात त्याला योग्य सेवा देण्याऐवजी उलट उडवाउडवीचीच उत्तरे ऐकायला मिळत आहेत. गावागावातील फ्युज बॉक्‍सची अवस्था पाहता हे बॉक्‍स तुटलेल्या अवस्थेत पहावयास मिळतात. काही वेळा तर शेतकऱ्यालाच पदरमोड करुन दुरुस्ती करावी लागत आहे. नवीन घरगुती कनेक्‍शनसाठी नियमाप्रमाणे विद्युत मंडळ पैसे भरुन घेतात. परंतु कनेक्‍शन देताना कोणतेही साहित्य दिले जात नाही. हे साहित्य नक्की कुठे जाते? असाही सवाल ग्राहकांमधून विचारला जात आहे.

कराड तालुक्‍यातील गावागावात सध्या विद्युत मंडळाने गावातील ग्राहकांची घरगुती स्वरुपातील कनेक्‍शने वसुलीच्या नावाखाली जबरदस्तीने तोडल्याच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढच होवू लागली आहे. यामुळे विज वितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमधून प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. विद्युत मंडळाचे कर्मचारी आमच्या कार्यालयाकडे दुरुस्तीसाठी व नवीन कनेक्‍शनसाठी लागणारे कोणतेही साहित्य आमच्याकडे नाही. अशी उत्तरे देतात. साहित्य नसेल तर रक्कमा भरुन कशाला घेता? असाही संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

गावागावातील शिवारात बऱ्याच ठिकाणी वीजेच्या तारा लोंबकळत्या अवस्थेत आहेत, याकडे वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. अशा अनेक तक्रारी यानिमित्ताने शेतकरी करु लागले आहेत. सैदापूर परिसरातील लोकांची नोव्हेंबर महिन्याची घरगुती बिले वाटपच केली नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे एकाच वेळी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याची विजबिले लोकांना देवून वीज मंडळाने ग्राहकांना धक्‍काच दिला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. विज मंडळाच्या या गलथान कारभाराबाबत नागरिकांमधून असंतोष पसरला आहे.

वीजवितरणकडून चांगल्या सेवेची अपेक्षा
कराड तालुक्‍यामध्ये शॉर्ट सर्किटने बऱ्याच शेतकऱ्यांचे ऊस जळून मोठे नुकसान होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अशा घटनांमधून शेतकऱ्यांच्या जीवालाही धोका पोहचण्याची भिती निर्माण होत असते. याला जबाबदार कोण? तसेच शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असे एक ना अनेक प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत राहिलेले आहेत. यासह विद्युत मंडळाने बिलांच्या चुकीच्या येणाऱ्या रक्कमा, घेतलेले चुकीचे रिडींग यामध्ये सुधारणा करुन लोकांना चांगली सेवा द्यावी, अन्यथा संतप्त ग्राहकांसह शेतकरी रस्त्यावर उतरतील. यात तीळमात्र शंका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)