रिझल्ट’ द्या अन्यथा घरचा रस्ता!

 

पिंपरी – महापालिका शाळांचा खालावलेला शैक्षणिक दर्जा, विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या व महापालिका शिक्षण समितीच्या ढिसाळ कारभाराचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना एकाही प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. “माहिती घेऊन उत्तर देते ‘ या एकसारख्या उत्तराने महापौर राहुल जाधव चांगलेच संतापले. एका महिनाभरात शाळांचा दर्जा सुधारा अन्यथा एक तर तुम्ही तरी घरी जाल; किंवा मी तरी जाईन, असा निर्वाणीचा इशाराच दिला. यामुळे सभागृह अवाक्‌ झाले.

-Ads-

दीड वर्षांपूर्वी महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त झाले. त्यानंतर महापालिकेत भाजपा सत्ता आल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या समितीच्या एकाही पाक्षिक बैठकीच्या विषयपत्रिकेत महत्त्वाच्या विषयाचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित न केल्याने प्रशासनावर माध्यमांनी जोरदार टीका करण्यात आली. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महापौर राहूल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण समिती व प्रशासनाची एकत्रित आढावा बैठक आयोजित केली होती. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला समिती अध्यक्षा प्रा. सोनाली गव्हाणे, सदस्या अश्‍विनी चिंचवडे, विनया तापकीर, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, पराग मुंढे आदी उपस्थित होते.

या बैठकीत महापौर राहुल जाधव यांनी महापालिका शाळांसंदर्भात विविध विषयांची प्रश्‍नावली तयार करुन आणली होती. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे द्या अशी सूचना करताच प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर माहिती घेऊन देते, असे ज्योत्स्ना शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे महापौरांच्या रागाचा पारा चांगलाचा चढला. त्यांनी शिंदे यांना चांगलेच धारेवर धरले. उद्योगनगरीतील महापालिकेच्या शाळेत कामगार, कष्टकऱ्यांची मुले शिकत आहेत. त्यांना दर्जेदार शिक्षण देणे, हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चुनही दिवसें-दिवस महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा दिवसें-दिवस ढासळत आहे. दीड वर्षांनंतर किमान 15-20 विषयांचा तरी विषय पत्रिकेत समावेश असणे अपेक्षित होते. मात्र; तसे काही झाले नाही. त्यामुळे ही पडझड तत्काळ रोखा. अन्यथा घरी जाण्याची तयारी ठेवा, अशा शब्दांत त्यांनी शिंदे यांना सुनावले.

आयुक्त हर्डीकर यांनी देखील या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आतापर्यंत शिक्षण समितीच्या वतीने केवळ विविध प्रकारच्या खरेदीवरच जोर दिला आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना मुलसभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावा, अशा शब्दांत कानपिचक्‍या दिल्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)