रिझर्व्ह बॅंकेचे काम सीट बेल्टसारखे : रघुराम राजन

सीट बेल्ट नसल्यास अपघात होण्याची शक्‍यता वाढते 

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंक कारच्या सीट बेल्टसारखी असते. ती नसेल तर अपघात होण्याची शक्‍यता जास्त असते. ती एक राष्ट्रीय संस्था असून तिचे संवर्धन करणे गरजेचे असते. त्यामुळे अर्थमंत्रालय आणि बॅंकेदरम्यान काही मतभेद असतील तर वाढायला नकोत, असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की, जर तुम्ही गव्हर्नर किंवा डेप्युटी गव्हर्नरची एकदा नियुक्‍ती केली तर त्यांचे ऐकण्याची गरज असते. तरीही जर मतभेद निर्माण झाले तर एकमेकांचा आदर राखत मतभेद कमी करण्याची गरज असते असे ते म्हणाले. जर एखादी सूचना सरकारने केली तर त्यावर पूर्ण विचार करून बॅंकेला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. सरकारने आपली बाजू स्पष्ट केल्यानंतर बॅंकेला आपला निर्णय घेऊ देण्याची गरज असते. बॅंकेच्या संचालक मंडळाला बॅंकेचे एक संस्था म्हणून हित पाहायाचे असते. इतर बाबी बॅंकेच्या दृष्टिकोनातून गौण असतात असे राजन म्हणाले. मात्र, बॅंकेला न जुमानणे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी चांगले नसते. बिगर बॅंकिंग वित्त संस्थांत जर भांडवल सुलभतेचा प्रश्‍न असेल तर सरकार त्यांना फारशी मदत करू शकणार नाही. त्याचबरोबर या संस्थांना रिझर्व्ह बॅंक थेट भांडवल पुरवठा करू शकणार नाही.

त्यांनी सांगितले की, इतर देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. महागाई कमी पातळीवर ठेवण्यात रिझर्व्ह बॅंकेने चांगली कामगिरी केली आहे. त्याचे श्रेय सरकारने बॅंकेला देण्याची गरज आहे. त्यामुळे भारताची स्थूल अर्थव्यवस्था चांगली आहे. मात्र चालू खात्यावरील तुटीकडे लक्ष देण्याची गरज आसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की आता व्याजदर कमी होण्याची शक्‍यता कमी आहे. कारण केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वच देशातील बॅंका व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या परिस्थितीत आरबीआयने राहुल द्रविडप्रमाणे गांभीर्याने निर्णय घेण्याची गरज असून नवज्योत सिद्धू सारख्या नुसत्या बाता करणे टाळावे, असे त्यांनी म्हटले.

राजन यांनी आरबीआय संदर्भातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्यांवरील संकट (एनबीएफसी), प्रॉम्प करेक्‍टिव्ह ऍक्‍शन (पीसीए), केंद्रीय माहिती आयोगाची नोटीस (सीआईसी) तसेच आरबीआयच्या बोर्डसहित अनेक मुद्द्यांवर त्यांनी खुलेपणाने आपले विचार व्यक्त केले. रुपयाच्या अस्थिरतेवर बोलताना राजन म्हणाले, रुपयाची चांगली पातळी काय असावी याबाबत आपण काही सांगू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)