“रिंग रोड’प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांचा काढता पाय

बाधितांनी ताफा अडवला : “नो एन्टी’तून फडणवीस बाहेर

पिंपरी – घरे वाचवण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रिंग रोड बाधितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोसरी येथे भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या परवानगीनंतर दिलेले निवेदनही त्यांनी स्वीकारले नाही. त्यावर संतापलेल्या बाधितांनी रस्त्यावर उतरत मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. वातावरण चांगलेच चिघळल्याने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला “नो एन्टी’तून वाट मोकळी करून देण्यात आली.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात शहरातील विविध विकास कामांचे ई-उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज (शनिवारी) झाले. यावेळी घर बचाव संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्धार रिंग रोड बाधितांनी केला. लांडगे सभागृहासमोर सकाळी अकरापासून त्यांनी ठिय्या मांडला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी रिंगरोड बाधितांना दुपारी इंद्रायणी मंगल कार्यालयाच्या आवारात अक्षरशः नजरकैदेत ठेवले. प्रवेशद्वाराला दोरखंड बांधून त्यांना बाहेर येण्यासही मज्जाव करण्यात आला. जवळपास दीड हजार महिलांचा सहभाग असल्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयातून जास्तीची कुमक मागविण्यात आली होती. जमावाला पांगवण्यासाठी राखीव पोलीस दलाची तुकडीही तैनात होती. भर उन्हात रिंगरोड बाधित मुख्यमंत्र्यांची वाट पाहत बसले होते. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे भोसरीत आगमन झाले.

मुख्यमंत्री आल्यानंतर घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि समितीचे इतर पदाधिकारी पोलिसांच्या परवानगीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्यासाठी गेले. ई-उद्‌घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी ते निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. याबाबतची माहिती समजताच संतापलेल्या बाधितांनी पोलिसांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला. जवळपास एक हजारच्या आजपास महिला ताफ्यासमोर रस्त्यावर उतरल्या. त्यावेळी शहरातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला नो एन्ट्रीतून मार्ग काढून दिला. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे रिंगरोड बाधितांनी तीव्र संताप व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)