“रिंगरोड’बाबत महासभेत चर्चेची मागणी

भाऊसाहेब भोईर : महापौरांनी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन

पिंपरी – रिंगरोडच्या प्रश्‍नामुळे शहरातील वातावरण भयभीत झाले आहे. हा प्रस्तावित प्रकल्प राबविल्यास हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त होणार आहेत. घरे लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असल्याने शहराचे पालक म्हणून महापालिका सर्वसाधारण सभेत लक्षवेधी सूचना मांडून चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी महापौरांकडे केली आहे. तसेच, महापौरांना रिंगरोडबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही केली आहे.

भोईर यांनी महापौर नितीन काळजे यांना लक्षवेधी सूचना घेण्याबाबत पत्र दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपण राजकीय पक्ष म्हणून वेगवेगळी भूमिका असली, तरी सभागृहात शहराचे विश्‍वस्त म्हणून भूमिका बजवावी लागते. रिंगरोड प्रस्तावित असताना तेथील जमिनींची खरेदी-विक्री करून दलालांनी नागरिकांना फसवले आहे. तेथील बांधकामांना महापालिका, प्राधिकरण, एमएसईबी यांनी सेवा-सुविधा का पुरविल्या ? वेळीच अटकाव प्रशासनाकडून केला गेला नाही. त्याची शिक्षा सर्वसामान्य नागरिकांना आता भोगावी लागत आहे.

भावनेच्या आहारी न जाता कायदेशीर मार्ग रितसर मार्ग काढणे गरजेचे आहे. विकास शहराचा आत्मा असल्याने त्याची गरज आहे, परंतु नागरिकांची घरे उद्धवस्त करणे योग्य नाही. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार शहराचे प्रथम नागरीक म्हणून करावा. पालिका सभेत लक्षवेधी सूचना घेऊन त्यावर सर्व नगरसेवकांनी आपली मते मांडावीत. या सभेत शहराचे पालक म्हणून महापौरांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भोईरांनी केली. विकास गरजेचा असला, तरी विकासासाठी आत्मसंतुलन ढासळू देवू नका. कोणत्याही राजकीय घटकांनी याचे राजकीय भांडवल करू नये. मोर्चात जावून किंवा मुख्यमंत्री, पंतप्रधानांना पत्रे देताना सेल्फी काढणे थांबले पाहिजे. तसेच,अडीच किमी अंतराचा विषय आहे. तर, तेवढ्या अंतराचा मार्ग बदलून दुसरीकडून न्यावा आणि नागरिकांची घरे वाचवावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)